संदेशवहन हा नियतकालिकांचा आत्मा : प्रमोद बापट ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचा सन्मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विश्व संवाद केंद्र, विदर्भ प्रांताच्या चंद्रपूर विभागाच्या वतीने देवर्षी नारद जयंतीनिमित्त श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात आयोजित समारोहात गडचिरोलीतील ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथ प्रदान करून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम क्षेत्र (मुंबई) प्रचारक प्रमोद बापट, चंद्रपूरचे ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास, गडचिरोली जिल्हा प्रसार प्रमुख प्रा. राकेश इनकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रमोद बापट म्हणाले की, आद्य पत्रकार देवर्षी नारद हे भारतीय परंपरेतील पहिले पत्रकार मानले जातात. त्यांनी सत्य, संवाद आणि समाजहिताची भावना जपत माहितीचे आदान-प्रदान केले. आजच्या पत्रकारांसाठी त्यांचा आदर्श प्रेरणादायी आहे.
संदेशवहन हा नियतकालिकांचा आत्मा असून, टीआरपीच्या स्पर्धेत अनेकदा सत्यापेक्षा निरुपयोगी बाबींना अधिक महत्त्व दिले जाते. घटनेचे सत्य एकच असते, मात्र त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. त्यामुळे बातमीवर योग्य प्रक्रिया करून समाजाला काय आवश्यक आहे, याचा शोध पत्रकारांनी घेतला पाहिजे.
ज्येष्ठ पत्रकार मुरलीमनोहर व्यास यांनी देवर्षी नारदांच्या कार्याचा उल्लेख करताना सांगितले की, त्यांच्याकडे विविध शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. समाज आणि संस्कृतीच्या कल्याणासाठी ज्ञानाचा उपयोग करण्याची संकल्पना आजच्या पत्रकारितेलाही मार्गदर्शक ठरू शकते. तसेच सामाजिक माध्यमांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना शब्द आणि भाषेवर नियंत्रण राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सन्मानित पत्रकार अविनाश भांडेकर हे गेल्या ३५ वर्षांपासून विधायक पत्रकारितेत कार्यरत आहेत. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या भांडेकर यांनी विविध साप्ताहिके व दैनिकांमधून पत्रकारितेचा प्रदीर्घ प्रवास केला असून, २००७ पासून ते दैनिक पुण्यनगरीचे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत.
ते नागपूर अधिस्वीकृती समितीचे सदस्य असून त्यांना महाराष्ट्र मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबईचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, अरविंद बाबू देशमुख सामाजिक पत्रकारिता पुरस्कार तसेच महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ पुरस्कार यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
कार्यक्रमाला चंद्रपूर प्रसार प्रमुख कपिष उजगावकर, विजय एंगलवार तसेच शहरातील विविध पत्रकार व मान्यवर उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




