महत्वाच्या बातम्या

 सोशल मीडिया आणि मोबाईल संपर्कातून फुललेले प्रेम ठरले जीवघेणे : धोपटाळा हत्याकांडातील आरोपी २४ तासांत जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील धोपटाळा कॉलनी येथे घडलेल्या विवाहित महिलेच्या निर्घृण हत्येचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि राजुरा पोलिसांच्या संयुक्त पथकाने अवघ्या २४ तासांत केला आहे.

प्रेमसंबंधातील वाद आणि नाकारल्याचा राग मनात धरून आरोपीने महिलेचा गळा चिरून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी तेलंगणा राज्यातील मंचेरियाल जिल्ह्यातून आरोपीला अटक करण्यात आली आहे.राजेश व्यंकटी अट्टेटेला (वय ३५), रा. रेपनपल्ली, ता. चेन्नूर, जि. मंचेरियाल असे आरोपीचे नाव आहे.

मृत महिला शितल रणधीर कुंभारे (३५) या काही दिवसांपासून धोपटाळा येथील माहेरी राहत होत्या. २९ मे रोजी सकाळी त्या राहात असलेल्या घरातील देव्हाऱ्याच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत आढळून आल्या. अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पती रणधीर कुंभारे यांच्या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखा आणि राजुरा पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक तपास, सायबर विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची सूत्रे आरोपीपर्यंत पोहोचली.

तपासादरम्यान राजेश व्यंकटी अट्टेटेला (३५), रा. रेपनपल्ली, ता. चेन्नूर, जि. मंचेरियाल, तेलंगणा याचे नाव समोर आले. त्याला तेलंगणातील रेपनपल्ली येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शितल कुंभारे आणि आरोपी राजेश अट्टेटेला यांची ओळख मंचेरियाल परिसरातील नातेवाईकांच्या माध्यमातून झाली होती. दोघांमध्ये पूर्वी प्रेमसंबंध होते आणि एकमेकांशी विवाह करण्याचाही विचार झाला होता. मात्र कालांतराने दोघांचेही वेगवेगळ्या ठिकाणी विवाह झाले.

विवाहानंतरही दोघांमध्ये सोशल मीडिया, चॅटिंग आणि मोबाईलद्वारे संपर्क सुरू होता. काही दिवसांपूर्वी शितल यांनी आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याने तो संतप्त झाला होता. शितल माहेरी आल्याची तसेच घरातील सदस्य बाहेरगावी जाणार असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्यानंतर तो धोपटाळा येथे पोहोचला. दोघांमध्ये झालेल्या वादातून आरोपीने रागाच्या भरात शितल यांची धारदार शस्त्राने हत्या केली आणि    घटनास्थळावरून फरार होऊन तेलंगणात परतल्याचे तपासातून समोर आले आहे.

सायबर सेलच्या मदतीने मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुराव्यांचे विश्लेषण करण्यात आले. त्याच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. या धडाकेबाज कारवाईमुळे जिल्ह्यातील खळबळजनक हत्याकांडाचा अवघ्या एका दिवसात उलगडा झाला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, यांचा मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे, राजुरा चे ठाणेदार आसिफराजा शेख यांचा नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि विनोद भुरले, सर्वेश बेलसरे, सुनील गौरकार, पोहवा सुभाष गोहोकार, पौहवा किशोर वैरागडे, पोहवा अजय बागेसर, पोहवा सतिश अवघरे, पोहवा इम्रान खान, पोहवा संतोष येलपुलवार, पोहवा गणेश मोहुर्ले, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं शेखर माथनकर, पोअं गोपीनाथ नरोटे, पोअं शशांक बादामवार, पोअं किशोर वाकाटे, चापोअं वृषभ बारसिंगे, चापोअं गजानन मडावी तसेच राजुरा पोलीस स्टेशन चे सपोनि लक्ष्मण लोकरे, पोउपनि दिपक ठाकरे, पोउपनि पराग उल्लेवार, पोउपनि अतुल राठोड, सफौ किशोर तुमराम, पौहवा अनुप डांगे, पोहवा विक्की निवार्न, पोअं शाफिक शेख, पोअं मिलीद जांभुळे, पोअं महेश बोडगेलवार, पोअं राजु दुबे व सायबर सेल, चंद्रपूर चे पौहवा कार्तिक खनके, पोअं गुणवंत, पोअं अनिमेश यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos