त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याच्या कामात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि. चा सहभाग


- बोदली येथे लावणार ११ हजार वृक्ष 
- त्रिपक्षीय करारातून राज्यात फुलतेय वन, चारवर्षात ३५८.१४९ हेक्टरवर वृक्षलागवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  मुंबई  :
त्रिपक्षीय करारातून राज्यात वनराई फुलवण्याचं काम जोमानं सुरु असून आतापर्यंत चार वर्षात ३५८.१४९ हेक्टर वन जमीनीवर या पद्धतीने ५ लाख १७ हजार ०९६ वृक्षलागवड झाली आहे, अशा पद्धतीने राज्यातील हरित क्षेत्रात वाढ करणारं महाराष्ट्र हे देशातील अग्रगण्य राज्य आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. या उपक्रमात लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि चा सुद्धा सहभाग असून उदयॊग निर्मितीसोबतच पर्यावरण संवर्धनाचे कामसुद्धा  लॉईडस मेटल्स कंपनी करणार आहे. जिल्ह्यातील बोदली येथे ११ हजार वृक्ष लावणार आहे. 
काल सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अवनत क्षेत्रावर वनीकरण करण्याबाबत वन विभाग औद्योगिक संस्था, अशासकीय संस्था यांच्यात त्रिपक्षीय करार करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस वन सचिव विकास खारगे यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्री सुधीर  मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या औद्योगिक संस्थांकडे, कंपन्यांकडे मोठ्याप्रमाणात सामाजिक दायित्व निधीची उपलब्धता असते. ज्या कंपन्या त्रिपक्षीय कराराद्वारे वृक्षलागवडीत सहभागी होऊ इच्छितात त्यांना वृक्षलागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जावे तसेच ज्या कंपन्या केवळ आपला सामाजिक दायित्व निधी देऊ इच्छितात त्यांना विविध ठिकाणी होणाऱ्या वृक्षलागवडीची माहिती देऊन त्यासाठी त्यांचे वित्तीय सहाय्य घेतले जावे. यासाठी वृक्षलागवडीसाठी उपलब्ध असलेल्या जागा व इतर संबंधित माहिती (ट्रीगार्ड, पाण्याची व्यवस्था, वृक्षांचे जतन आणि संवर्धन)  ज्यात ते निधीच्या माध्यमातून योगदान देऊ शकतात त्यांची यादी केली जावी व ती त्यांना पाठवली जावी.
यंदा हरित दिवाळी साजरी केली जावी  असे आवाहन करून सुधीर  मुनगंटीवार म्हणाले की, विदर्भात ९२ हजार हेक्टर झुडपी जंगल आहे तिथे तसेच मराठवाड्यात वृक्ष लागवडीला प्राधान्य दिले जावे, मराठवाड्यातील इको बटालियनला सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून सहकार्य केले जावे, सामाजिक दायित्व निधीतून मराठवाड्यात शेतात, शेतजमीनीवर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेतला जावा.
काल ५५.७० हेक्टर वनक्षेत्रावर जवळपास ५० हजार रोपे लावण्यासाठी चार औद्योगिक तसेच अशासकीय संस्थांना मान्यता देण्यात आली. यामध्ये मे. जिंदाल स्टील लि. डोलवी, टेरे पॉलिसी सेंटर, पुणे, आणि वन विभाग यांच्यात करार करण्यात आला. ही संस्था मौजे डोलवी, ता. पेण, जि. रायगड येथे २५ हेक्टरवर जवळपास २८ हजार वृक्ष लावणार आहे.
स्पॅन फुडस्, पुणे  आणि रोटरी क्लब, पुणे या संस्था मौजे महम्मदवाडी ता. हवेली, जि. पुणे येथे १८ हेक्टरवर ७२०० रोपं लावणार आहे. लॉईडस मेटल्स ॲण्ड एनर्जी लि आणि ग्रामीण लोकसेवा संस्था, गुमलकोंडा ही संस्था  बोदली, ता. गडचिरेाली  जि.गडचिरोली येथे १० हेक्टरवर ११ हजार रोपे लावणार आहे. श्री. गजानन महाराज संस्थान, शेगांव, श्री. गजानन शिक्षण संस्था- शेगांव ही संस्था  गिरडा, ता. बुलढाणा, जि. बुलढाणा येथे २.७० हेक्टरवर १६८७ वृक्ष लावणार आहे. या चार ही औद्योगिक आणि अशासकीय संस्थांकडून होणाऱ्या अंदाजे ५० हजार वृक्षलागवडीसाठी ते २ कोटी ३० लाख रुपयांच्या आसपास खर्च करणार आहेत. वन विभागाच्या जमीनीवर सात वर्षांचा करार करून या संस्था वृक्षलागवड, जतन आणि संवर्धन करतात. त्यानंतर हिरवाई फुललेलं हे वन, वन विभागाच्या ताब्यात दिले जाते. राज्यातील हरित क्षेत्र वाढण्यासाठी हे त्रिपक्षीय करार उपयुक्त सिद्ध  होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-26


Related Photos