स्वाधार योजनेच्या नूतनीकरण अर्जांना सुरुवात


- १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी नूतनीकरण (Renewal) अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाली आहे. सन २०२५-२६ मध्ये योजनेचा लाभ घेतलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज भरून त्याची प्रत संबंधित कार्यालयात सादर करावी, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती आशा कवाडे यांनी केले आहे.
१ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या https://hmasnew.mahait.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज सादर करावयाचा आहे. अर्ज भरताना मागील शैक्षणिक वर्षाचे गुणपत्रक तसेच चालू शैक्षणिक वर्षातील अभ्यासक्रमाची अद्ययावत माहिती पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक आहे. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे, तसेच निवास, भोजन, शैक्षणिक साहित्य आणि निर्वाह भत्ता यासाठी आर्थिक सहाय्य मिळावे, या उद्देशाने शासनाच्या वतीने ही योजना राबविण्यात येते.ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर अपलोड केलेली आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रिंट सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिव्हील लाईन, जि.प. चौक, भंडारा येथे जमा करावी.
मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत -
विद्यार्थ्यांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होऊन त्यांची छाननी वेळेत पूर्ण व्हावी आणि पात्र विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा भत्ता वेळेत मिळावा, यासाठी अर्जदारांनी मुदतीचे काटेकोरपणे पालन करावे. विहित मुदतीनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच मुदतीत अर्ज सादर न केल्यामुळे विद्यार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थ्याची राहील, असे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




