महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाचा अतिरिक्त कार्यभार तात्काळ काढा


- अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्या कार्यकाळातील कथित अनियमिततेच्या चौकशीची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली सार्वजनिक बांधकाम मंडळाचा अतिरिक्त कार्यभार अधीक्षक अभियंता नीता ठाकरे यांच्याकडून तात्काळ काढून गडचिरोलीसाठी पूर्णवेळ अधीक्षक अभियंत्याची नियुक्ती करावी, अशी मागणी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र देविकार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात नीता ठाकरे यांच्या कार्यकाळातील शासकीय वाहनाचा वापर, आरआरपी-२ योजनेतील कामे, निवृत्त अधिकाऱ्याच्या नियुक्तीची शिफारस, सावरगाव-कोडगूल रस्त्याच्या कामातील कथित अनियमितता तसेच खनिज विकास निधीअंतर्गत काढण्यात आलेल्या निविदांबाबत विविध आरोप करण्यात आले आहेत. या सर्व बाबींची निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी व तांत्रिक-आर्थिक लेखापरीक्षण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच शासकीय वाहनाचे लॉगबुक, इंधन खर्च, टोल नोंदी व आवश्यक सीसीटीव्ही फुटेज तपासून शासनाच्या निधीचा गैरवापर झाला आहे का, याची पडताळणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त जिल्ह्यात विकासकामांना गती मिळण्यासाठी पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे देवेंद्र देविकार यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदनातील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos