महिला बचतगटांच्या उत्पादनांना वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे


- उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल मंत्री जयकुमार गोरे यांचा उमेदच्या महिलांतर्फे सत्कार
- प्रत्येक जिल्ह्यात महिला बचत गटांचा स्वतःच्या मालकीचा उमेद मॉल उभारणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांच्या उत्पादनांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी उमेद मॉल उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांच्या विक्रीसाठी वर्षभर बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात महिला बचत गटांच्या स्वप्नांना भरारी व कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उमेदच्यावतीने वर्धा येथे उमेद मॉल मंजूर केल्याबद्दल ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांचा सत्कार करण्यात आला. देशाच्या एकूण लोकसंख्येत महिलांचा वाटा जवळपास निम्मा आहे. महिला सक्षम झाल्याशिवाय विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून उमेदच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या पंखांना बळ देण्याचे काम सुरू आहे. बचत गटांच्या माध्यमातून लाखो महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या असून त्यांनी स्वतःचे विश्व निर्माण केले आहे, असे गोरे म्हणाले.
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांवर सौर पॅनेल बसविण्याचे मोठे काम बचतगटांच्या महिलांना देण्याचे प्रस्तावित आहे. राज्यात सुमारे ३० लाख सोलर पॅनेल बसविण्याचे उद्दिष्ट असून, या कामात बचत गटांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. महिलांनी मागणी केलेल्या प्रमाणात त्यांना काम उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री गोरे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ग्रामीण महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. घरकुलासाठी मिळणाऱ्या अतिरिक्त अनुदानातून सौर ऊर्जेसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबतही निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
पुढे बोलतांना गोरे म्हणाले, देशातील लखपती दीदींच्या उद्दिष्टात महाराष्ट्राचा मोठा वाटा असून राज्यात ५० लाख महिलांना लखपती दीदी करण्याचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी बचत गटांची संख्या वाढवून अधिकाधिक महिलांना उमेदच्या माध्यमातून जोडण्यात यावे. महिला बचत गटांना आतापर्यंत सुमारे ५० हजार कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले असून महिलांनी कर्जाची परतफेड अत्यंत प्रामाणिकपणे केली आहे, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.
News - Wardha




Petrol Price




