वाघाच्या भीतीने धावपळ : बंधाऱ्यात बुडून पिता-पुत्राचा दुर्दैवी मृत्यू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : परिसरात वाघ दिसल्याने झालेल्या घाबरलेल्या धावपळीत बंधाऱ्याच्या खोल पाण्यात पडून पिता-पुत्राचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना छवारी शिवारात घडली. या दुर्घटनेत जीवन धर्मदास कोकोडे ३६ वर्ष आणि त्यांचा वर्षीय मुलगा जतीन जीवन कोकोडे इयत्ता दुसरी यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून वन्यजीवांच्या वाढत्या दहशतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीवन कोकोडे हे त्यांचा मुलगा जतीन आणि साळा संजय उईके २८ वर्ष रा. सालई यांच्यासोबत छवारी शिवारातील लखन बंधाऱ्याजवळील शेतात कामासाठी गेले होते. तिघेही शेतातील काम करत असताना संजय उईके यांना काही अंतरावर पट्टेदार वाघ दिसला.
वाघ दिसताच संजय यांनी आरडाओरड करून सावध केले. अचानक निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात तिघांनीही सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या दिशेने धाव घेतली. संजय उईके हे बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने धावले, तर जीवन कोकोडे आणि त्यांचा मुलगा जतीन हे बंधाऱ्याच्या वरच्या दिशेने पळू लागले.
धावत असताना अचानक जतीनचा पाय घसरला आणि तो बंधाऱ्याच्या खोल पाण्यात पडला. मुलाला वाचवण्यासाठी जीवन कोकोडे यांनी कोणताही विचार न करता पाण्यात उडी घेतली. जीवन यांना पोहता येत असले तरी पाण्याची खोली आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात दोघेही खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिस ठाण्याचे ठाणेदार नारायण तुरकुंडे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी शेषराव टुले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य राबवून पंचनामा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मृतांच्या वारसांना २५ लाखांची नुकसानभरपाई -
घटनेचे गांभीर्य तसेच परिसरात आढळून आलेले वाघाच्या पायांचे ठसे लक्षात घेऊन वनविभागाने मृत पिता-पुत्राच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची नुकसानभरपाई जाहीर केली आहे.
तसेच तातडीची मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले आहेत. वारसांना नोकरी देण्याची शिफारस करण्यात येणार असल्याची माहिती सहायक वनसंरक्षक गोविंद लुचे यांनी दिली.
या घटनेनंतर छवारी परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
News - Nagpur




Petrol Price




