महत्वाच्या बातम्या

 रोजगाराच्या शोधात नागपुरात आलेल्या अनोळखी व्यक्तीचा ट्रकखाली येऊन मृत्यू


- वाडी रिंग रोडवरील हृदयद्रावक घटना; मृताची ओळख पटली नाही, गिट्टीखदान पोलिसांकडून तपास सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : रोजगाराच्या शोधात पश्चिम बंगालमधून नागपुरात आलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा वाडी रिंग रोड परिसरात आयशर ट्रकखाली आल्याने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी सायंकाळी घडली. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ३५ ते ४० वर्षे असून, अद्याप त्याची ओळख पटलेली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्हाईट हाउस चौक ते वाडी रिंग रोड परिसरात दिनेश सुखलाल गौतम ३५ यांची चहाची टपरी आहे. रविवारी सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या टपरीवर आली. संबंधित व्यक्तीने आपण पश्चिम बंगालमधून रोजगाराच्या शोधात नागपुरात आल्याचे सांगितले. नागपूर, वाडी तसेच गिट्टीखदान परिसरात कामाच्या शोधात फिरत असूनही काम मिळाले नसल्याचे त्याने सांगितले.

काही दिवसांपासून अन्न मिळाले नसल्याने आपण उपाशी असल्याचेही त्याने चहा विक्रेता दिनेश गौतम यांना सांगितले. त्याने आपल्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत जीवन संपविण्याचा विचार असल्याचे सांगितल्याची माहिती आहे. दिनेश गौतम यांनी त्याला चहा दिला. त्यानंतर ते आपल्या कामात व्यस्त झाले. दरम्यान, काही वेळाने तेथून जात असलेल्या आयशर ट्रकसमोर संबंधित व्यक्ती गेल्याने ती ट्रकखाली आली. या दुर्घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.

घटनास्थळी नागरिकांची गर्दी -
घटना घडताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच्या नातेवाइकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक माहिती संकलित केली जात आहे.

मृताची ओळख पटविण्याचे आवाहन -
मृत व्यक्तीच्या अंगावर निळ्या रंगाचा गोल गळ्याचा हाफ टी-शर्ट आणि निळ्या रंगाची ट्रॅक पँट असून, ट्रॅक पँटवर पिवळ्या रंगाची उभी रेष आहे. त्याने निळ्या-लाल रंगाचे बूट परिधान केले होते.

या वर्णनावरून संबंधित व्यक्तीची ओळख पटत असल्यास किंवा त्याच्याबाबत कोणाला माहिती असल्यास गिट्टीखदान पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

रोजगारासाठी स्थलांतरित व्यक्तींच्या सुरक्षिततेचा प्रश्न -
या घटनेमुळे रोजगाराच्या शोधात परराज्यातून शहरात येणाऱ्या स्थलांतरित कामगारांच्या परिस्थितीचा प्रश्नही समोर आला आहे. कामाच्या शोधात शहरात येणाऱ्या व्यक्तींना रोजगारासोबतच अन्न, निवारा आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळण्याची व्यवस्था उपलब्ध होणे गरजेचे आहे.

मृत व्यक्तीने नेमक्या कोणत्या परिस्थितीत हे टोकाचे पाऊल उचलले, त्याच्या कुटुंबीयांचा किंवा परिचितांचा ठावठिकाणा कुठे आहे आणि नागपुरात तो किती दिवसांपासून वास्तव्यास होता, याचा तपास गिट्टीखदान पोलिसांकडून करण्यात येत आहे. मृताची ओळख पटल्यावर या घटनेमागील परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos