मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय : २९ जुलैला शाळा-महाविद्यालये बंद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी २९ जुलै रोजी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी २९ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच सर्व खाजगी कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असून अतिवृष्टीमुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये आणि जिल्ह्यात अनुचित घटना घडू नयेत, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने २९ व ३० जुलै या दोन दिवसांसाठीही चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांनुसार मुसळधार पावसादरम्यान नागरिकांनी शक्यतो घरातच सुरक्षित राहावे. पाणी साचलेल्या सखल भागातून, अंडरपासमधून तसेच पूरस्थिती निर्माण झालेल्या रस्त्यांवरून प्रवास टाळावा. जोरदार पाऊस व कमी दृश्यमानता असताना वाहन चालवू नये. तसेच विजेच्या तारांपासून, खांबांपासून आणि इतर लोखंडी वस्तूंपासून सुरक्षित अंतर राखावे.
मेघगर्जना व वीजांच्या कडकडाटाच्या वेळी उघड्या जागेत, उंच झाडाखाली किंवा लोखंडी शेडमध्ये आश्रय घेऊ नये. घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, लँडलाईन फोनचा वापर टाळावा तसेच पाण्याशी संबंधित नळ किंवा पाइपलाइनला स्पर्श करू नये, अशा सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत.
मुसळधार पावसामुळे नदी, नाले किंवा पुलांवरून पाणी वाहत असल्यास ते ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ०७१७२-२५००७७ या दूरध्वनी क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




