महत्वाच्या बातम्या

 किटाडी जंगल परिसरात वाघाचा वावर : टेकेपार उपसा सिंचन परिसरात बिबट्याचे दर्शन, वन विभाग सतर्क


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / भंडारा : अड्याळ वनपरिक्षेत्रातील लाखनी तालुक्यातील किटाडी जंगल परिसरात पट्टेदार वाघाच्या वाढत्या वावरामुळे वन विभाग सतर्क झाला असून, वन कर्मचारी आणि जलद बचाव पथकाला घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी पिलांद्री गाव शिवारात पट्टेदार वाघाने एका दुभत्या म्हशीवर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडल्यानंतर वन विभागाने जंगल परिसरात गस्त वाढवून हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अड्याळ वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी नियमित जंगल परिसरात फिरून पाहणी करीत आहेत. परिसरात पट्टेदार वाघाचा नियमित वावर असल्याने कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून ग्रामस्थांचे संरक्षण व्हावे, यासाठी विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

वन विभागाकडून जंगलात रानभाज्या किंवा इतर वनउत्पादने संकलनासाठी जाणाऱ्या नागरिकांना आवश्यक सूचना देण्यात येत असून, सुरक्षिततेबाबत जनजागृतीही केली जात आहे. वन विभागाच्या या उपक्रमामुळे जंगलात जाणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी संभाव्य धोका लक्षात घेता प्रत्येकाने सतर्क राहून आवश्यक काळजी घेणे गरजेचे असल्याचे वन विभागाने स्पष्ट केले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शर्मा यांनी नागरिकांना शक्यतो जंगलालगत जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. जंगलात कोणताही संशयास्पद आवाज, हालचाल किंवा पट्टेदार वाघ, बिबट, अस्वल अथवा इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन विभाग व जलद बचाव पथक जंगलातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

टेकेपार उपसा सिंचन परिसरात बिबट्याच्या वावराने वाढली चिंता -
दरम्यान, भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार येथील टेकेपार उपसा सिंचन परिसरात गेल्या महिनाभरापासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. विशेष म्हणजे, नुकतेच उपसा सिंचन प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मेन गेट बिबट्याचे दर्शन तेथील कर्मचाऱ्यांनाही झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सध्या धान लागवडीचा हंगाम सुरू असल्याने शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वाढता वावर चिंतेचा विषय ठरत आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नसली, तरी बिबट्याचे सातत्याने दर्शन होत असल्याने वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवावे आणि नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वन विभागाने नागरिकांना बिबट्याचे किंवा इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्यास त्यांच्याजवळ जाण्याचा अथवा त्यांना हुसकावण्याचा प्रयत्न न करता तात्काळ वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे, असेही वन विभागाने स्पष्ट केले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos