कोरोनाच्या चाचण्या वाढवून निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा जिल्हानिहाय आढावा मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतला. यावेळी त्यांनी चाचण्या वाढवून कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणण्याचे तसेच कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा अतिरेक न करण्याच्याही सूचना केल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुख्य सचिव सीताराम कुंटे सध्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी संवाद साधून आढावा घेत आहेत. आज त्यांनी पुणे आणि नाशिक विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी उपस्थित होते.
राज्यातील काही जिल्ह्यांचा कोरोना रुग्ण संख्येचा पॉझिटीव्हीटी दर जास्त असून जिल्हा प्रशासनाने कोरोना निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करतानाच चाचण्यांची संख्या वाढवा. कन्टेन्मेंट झोनची उपाययोजना प्रत्यक्षात आणा. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करताना अतिरेक होऊ देऊ नका, अशा सूचना दिल्या.
कन्टेन्मेंट झोनसाठी असलेल्या उपाययोजनांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरु करावी. शहरी भागात महापालिका आणि पोलीस प्रशासनाने समन्वयाने काम करुन नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी आवाहन करावं. तसंच नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. ज्यांना होम क्वॉरन्टीन केले आहे, त्यांचा यंत्रणेने दररोज आढावा घेऊन आरोग्य विषयक पाठपुरावा करावा, असेही त्यांनी नमूद केले.
कोरोना नियमांचे प्रभावीपणे पालन करण्यासाठी मी जबाबदार ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवावी. विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देशही मुख्य सचिवांनी दिले. कोरोना प्रतिबंधाबाबत जिल्हा प्रशासनाला गेल्या वर्षभरापासूनचा अनुभव असून कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मैदानात उतरुन उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही मुख्य सचिवांनी केले.
सध्या राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु असून त्याला गती द्यावी. ज्या जिल्ह्यांचा पॉझिटीव्हीटी दर जास्त आहे तेथे लसीकरण वाढवण्याकरीता अतिरिक्त साठा देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरण मोहिम राबवण्यात यावी. त्याठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नियमित भेटी देऊन लसीकरणाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दिले आहेत.
  Print


News - Rajy | Posted : 2021-03-12


Related Photos