महत्वाच्या बातम्या

 ३३ केव्ही तारांचा बांबूला स्पर्श : बांधकाम कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू


- देसाईगंजच्या भगतसिंग वॉर्डात दुर्घटना; छताच्या कॉलमच्या ढलाईदरम्यान अनर्थ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : घराच्या बांधकामादरम्यान जवळून जाणाऱ्या ३३ केव्ही उच्चदाबाच्या विद्युत तारांना बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बांबूचा स्पर्श झाल्याने ५६ वर्षीय बांधकाम कामगाराचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास देसाईगंज शहरातील भगतसिंग वॉर्डात घडली. सुरेश नानाजी लोखंडे ५६ वर्षे रा. मोहताळा, ता. देसाईगंज असे मृत कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकुला साखरे टेभुर्णे यांच्या भगतसिंग वॉर्डातील घराचे बांधकाम सुरू होते. या बांधकामाचे कंत्राटदार मनोज ढोरे रा. भगतसिंग वॉर्ड, देसाईगंज असल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सायंकाळी बांधकाम सुरू असताना परिसरात पावसाची रिपरिप सुरू होती. घराच्या छतावरील कॉलमच्या ढलाईचे काम सुरू असताना बांबूचा वापर केला जात होता. याचवेळी बांधकामाच्या अगदी जवळून जाणाऱ्या ३३ केव्ही प्रवाही उच्चदाबाच्या विद्युत तारांना अचानक बांबूचा स्पर्श झाला.

तारांचा बांबूला स्पर्श होताच विद्युत प्रवाहाचा धक्का बसून सुरेश लोखंडे गंभीररीत्या जखमी झाले. दुर्घटनेनंतर बांधकामस्थळी एकच गोंधळ उडाला. कंत्राटदार मनोज ढोरे यांनी तातडीने सुरेश लोखंडे यांना देसाईगंज येथील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले.

पावसाळ्यात उच्चदाबाच्या विद्युत तारांच्या परिसरात बांधकाम करताना सुरक्षेच्या नियमांचे पालन करणे अत्यावश्यक असते. या दुर्घटनेमुळे बांधकामस्थळी विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर राखण्याचा तसेच कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos