विना परवाना अवैध मासेमारी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल


- पोलिस व मत्स्य विभागाची संयुक्त कारवाई
- ८० किलो तिलापिया व पडन जातीचे मासे जप्त
विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : निम्न वर्धा प्रकल्प क्षेत्रात बेकायदेशिरित्या सुरु असलेल्या मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे यांच्या मार्गदर्शनात आर्वी पोलिस स्टेशनच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८० किलो तिलमिया व पडन जातीचे चोरीचे मासे व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील नियोजन समितीच्या बैठकीत आमदार दादाराव केचे यांनी निम्न वर्धा प्रकल्पात अवैध मासेमारी होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. याची पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दखल घेऊन मत्स्य विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार मत्स्य विभागाने २३ डिसेंबर रोजी सकाळी ११.३०वाजताच्या सुमारास निम्न वर्धा प्रकल्पातील मौजा धनोडी येथील पिपरी पारगोठाण आणि हैबतपूर परिसरात केलेल्या कारवाईत अंदाजे ३ हजार २०० रुपयाचे वजन काटे व मापे, कॅरेट, डिस्को जाळी व इतर मासेमारी साधने तसेच एक जुनी वापरात असलेली होंडा मोटारसायकल व अंदाजे ८० तिलपिया व पडन जातीचे चोरीचे मासे जप्त केले. जप्त करण्यात आलेले मासे नष्ट करण्यात आले.
या कारवाईदरम्यान घटनास्थळावरुन काही व्यक्ती पळून जाण्यात यशस्वी झाले तर चौकशीअंती पिंटू उर्फ निलेश लसनकर, आर्वी, धनराज भोवरे पिपरी पारगोठाण आणि जी. येकन्ना बाबू उर्फ जोसेफ आंध्रप्रदेश यांच्या विरुध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३२९ (३), ३/५ अंतर्गत मासेमारी चोरीचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया आर्वी पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. सदर कारवाई मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त स्वप्नील वालदे व कार्यालयातील लिपिक धोंडिबा जाधव, चालक लकी अफसर अली, आर्वी पोलिस स्टेशनचे उपनिरिक्षक राज पंडित व त्यांच्या पथकाने संयुक्तपणे केली.
शासकीय जलाशयांमध्ये होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभाग सतर्क असून यापुढेही अशी धडक मोहिम सुरुच राहील. विना परवाना मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कायदेशिर कारवाई केली जाईल, असे स्वप्नील वालदे यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




