तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने कारपेंटरचा मृत्यू


- उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली; सोनेगाव पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर शहरातील सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयप्रकाशनगर परिसरातील बांधकामाधीन इमारतीत फर्निचरचे काम करणाऱ्या ५२ वर्षीय कारपेंटरचा तिसऱ्या मजल्यावरून पडून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी सोनेगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मृताची ओळख ओमप्रकाश महेंद्र मिस्त्री (वय ५२) अशी झाली असून, ते मूळचे बिहार राज्यातील लखीसराय येथील रहिवासी होते. सध्या ते जयप्रकाशनगर येथील बांधकामाधीन ओसीएम बिल्डिंग क्रमांक २ मध्ये वास्तव्यास होते. त्याच इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ते फर्निचरचे काम करीत होते आणि कामाच्या ठिकाणीच रात्री मुक्कामही करीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, २३ जुलैच्या रात्री जेवण आटोपल्यानंतर ओमप्रकाश मिस्त्री हे नेहमीप्रमाणे तिसऱ्या मजल्यावर झोपले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजे २४ जुलै रोजी सकाळी सुमारे ६ वाजता इमारतीच्या सुरक्षा रक्षकाला ते पार्किंग परिसरात गंभीर जखमी अवस्थेत पडलेले आढळले. सुरक्षा रक्षकाने तत्काळ त्यांच्याशी विचारपूस केली असता, आपण तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय मेडिकल रुग्णालयाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने उपचार सुरू असतानाच २५ जुलै रोजी रात्री ११.१५ वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, ओमप्रकाश मिस्त्री हे नेमक्या कोणत्या कारणामुळे तिसऱ्या मजल्यावरून खाली पडले, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
News - Nagpur




Petrol Price




