बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिवस उत्साहात साजरा


- आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती व हक्कांच्या जतनाचा निर्धार; नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोकुळनगर येथील बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिवस उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. आदिवासी एकता युवा समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमाची सुरुवात समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकत आदिवासींची समृद्ध संस्कृती, परंपरा, रूढी, सामाजिक मूल्ये तसेच संविधानाने दिलेले हक्क याबाबत मार्गदर्शन केले.
जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा, अस्मितेचा आणि हक्कांचा सन्मान करण्याचा दिवस असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, सामाजिक एकता, संघटन आणि जागरूकता वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. आदिवासी समाजाची संस्कृती व परंपरा पुढील पिढीपर्यंत जतन करण्यासोबतच समाजाच्या विकासासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमास आदिवासी एकता युवा समितीचे अध्यक्ष अमोल कुळमेथे, सचिव प्रदीप कुळसंगे, संघटक संजय मेश्राम, कोषाध्यक्ष मंगेश नैताम, सहसचिव गिरीश उईके यांच्यासह आकाश कोडापे, देवाजी कोडापे, प्रफुल कोडापे, प्रशांत वरभे, वामनराव जुनघरे, अजय कुकडकर, वासुदेव कोडापे, सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे, शेषराव मडावी, शेखर मडावी, हरिदास अलाम, वामन येरमे, अनिल गणवीर, निलेश कोडापे, अंकुश उईके, नारायण मडावी, वासुदेव खंडाते, नागोराव उईके, बोबाटे, सुनील बावणे आदी उपस्थित होते.
समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गोकुळनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आदिवासी समाजाची एकता, अस्मिता आणि सामाजिक बांधिलकी अधिक बळकट करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
News - Gadchiroli




Petrol Price




