महत्वाच्या बातम्या

 पार्किंगच्या किरकोळ वादातून तरुणावर हल्ला : सहा जणांविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : मोटारसायकल पार्किंगच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका तरुणासह त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना रामनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेलटोली परिसरातील गुजराती शाळेजवळील यादव मोमोज सेंटर येथे रविवारी २ रात्री घडली. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आफताब आबिद पठाण २२, रा. आयटीआय कॉलेजजवळ, कारंजा हा रविवारी रात्री मित्र तहसीनसोबत रेलटोली परिसरातील यादव मोमोज सेंटर येथे गेला होता. यावेळी मोटारसायकल पार्किंगच्या कारणावरून आरोपी अजय राणे उर्फ राणा २३, रा. डब्लिंग कॉलनी, प्रवीण सुनील मुटके २४, रा. रेलटोली तसेच त्यांच्या अन्य चार साथीदारांसोबत वाद झाला.

वादानंतर आरोपींनी आफताब व त्याचा मित्र तहसीन यांना प्लास्टिकच्या स्टूलने, हातातील लोखंडी कड्याने तसेच हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी दोघांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात आफताबच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून शरीराच्या इतर भागांवरही किरकोळ जखमा झाल्या आहेत. घटनेनंतर रामनगर पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.





  Print






News - Gondia




Related Photos