सैनिक कल्याण विभागातर्फे विशेष गौरव : पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सन २०२५-२०२६ या वर्षासाठी विशेष गौरव पुरस्कार समितीची बैठक आयोजित असून सैनिक कल्याण विभागामार्फत प्राप्त प्रकरणांची छाननी करून विशेष गौरव पुरस्कार मंजूर करण्यात येईल. इयत्ता १० वी बोर्डाच्या परिक्षेत ९० टक्के व १२ वी बोर्डाच्या परिक्षेत ८५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण होणाऱ्या पहिल्या दहा माजी सैनिक/ विधवा यांच्या पाल्यांना एकरकमी २० हजार रुपये, तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक / पत्नी / पाल्य यांना एकरकमी २५ हजार रुपये विशेष गौरव पुरस्कार देण्यात येईल.
तसेच आयआयटी, आयआयएम, एम्स अशा नामवंत संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या माजी सैनिक / विधवा यांच्या पाल्यांना १ लक्ष रुपये, राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य संगीत, गायन, वादन, नृत्य इत्यादी क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर /जळीत /दरोडा/ अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमुल्य कामगिरी करणारे, तसेच देश / राज्याची प्रतिष्ठा वाढेल अशा स्वरुपाचे लक्षणीय काम करणारे माजी सैनिक /पत्नी /पाल्य इ. यांना त्यांच्या कार्याबद्दल राष्ट्रीय स्तरासाठी २५ हजार रुपये व आंतरराष्ट्रीय स्तरासाठी ५० हजार रुपयांचा पुरस्कार, जिल्हा सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या मार्फत प्रदान करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक / पत्नी / पाल्य / विधवा यांनी विशेष गौरव पुरस्कार निवडीसाठी आपले प्रस्ताव जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, चंद्रपूर येथे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सादर करावे. त्यानंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व संबंधित माजी सैनिक / विधवांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर यांनी केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




