महत्वाच्या बातम्या

 सक्करदऱ्यात गांजा विक्री करणारा तरुण अटकेत : १.३ किलो गांजा जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. विकी रमेश दुबे ३१ वर्षे रा. राणी भोसलेनगर झोपडपट्टी, भांडेप्लॉट, सक्करदरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे अमली पदार्थविरोधी पथक सोमवारी पहाटेच्या सुमारास परिसरात गस्त घालत होते. यावेळी राणी भोसलेनगर झोपडपट्टी परिसरातील महाकाली शीतलामाता मंदिराजवळील स्टेजच्या बाजूला एक तरुण हातात पिशवी घेऊन संशयास्पद अवस्थेत उभा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पथकाने तातडीने कारवाई करत त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडील पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी १ किलो ३०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत अंदाजे ३२ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी आरोपी विकी दुबे याच्याकडे अधिक चौकशी केली असता, हा गांजा भांडेप्लॉट येथील अस्लम ऊर्फ भुन्ऱ्या दाऊद खान ४५ वर्षे याच्याकडे विक्रीसाठी आणल्याची माहिती त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी विकी दुबे आणि अस्लम ऊर्फ भुन्ऱ्या दाऊद खान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गांजा पुरवठ्यामागील साखळी, विक्रीचे नेटवर्क आणि या प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर लक्ष ठेवून कारवाई केली जात असून, या कारवाईमुळे परिसरातील अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos