महत्वाच्या बातम्या

 पावसात कोलगाव-रामनगर रस्ता वाहून : निकृष्ट कामाचा पर्दाफाश , लाखो रुपयांचा निधी पाण्यात, चौकशी करून दोषींवर कारवाईची नागरिकांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा : तालुक्यातील कोलगाव-रामनगर मार्गावरील रस्ता अवघ्या दोन-तीन महिन्यांपूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आला होता. मात्र पहिल्याच जोरदार पावसात या रस्त्याची दुरवस्था झाली असून अनेक ठिकाणी रस्ता वाहून गेला आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याने संबंधित बांधकामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नव्याने तयार झालेला रस्ता इतक्या कमी कालावधीत खराब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून, काम सुरू असताना गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी असलेले अधिकारी नेमके काय करत होते, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच काम निकृष्ट असूनही संबंधित ठेकेदाराची बिले कशी मंजूर करण्यात आली, याबाबतही नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.

या घटनेमुळे शासनाचा लाखो रुपयांचा निधी वाया गेल्याची भावना नागरिकांमध्ये असून, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. संबंधित ठेकेदार, अभियंते आणि जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या निकृष्ट कामामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीची रक्कम संबंधितांकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसून, नागरिकांचे लक्ष आता प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos