महत्वाच्या बातम्या

 पारशिवनी शहरालगत वाघाचा मुक्तसंचार : शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पारशिवनी शहरालगतच्या ग्रामीण भागात पुन्हा एकदा वाघाच्या मुक्तसंचारामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोंढासावळी शिवारात मुक्काम ठोकून असलेला वाघ आमगाव, बिटोली, भुलेवाडी, पालासावळी आणि पेठ परसोडी परिसरातील शेतशिवारात नियमितपणे फिरत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गेल्या काही दिवसांपासून या भागात वाघाच्या पावलांचे ठसे आढळून येत आहेत. तसेच रात्रीच्या वेळी ऐकू येणाऱ्या डरकाळ्या आणि प्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेतात जावे लागत आहे. अशा परिस्थितीत वाघाचा शेती क्षेत्रात वाढलेला वावर हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर विषय ठरत आहे.

शहरालगतच्या शेती भागात वाढला वाघाचा वावर -
पारशिवनी तालुका हा पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रात येत असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच आढळतो. मात्र, सध्या वाघाने शहरालगतच्या शेती क्षेत्राकडे मोर्चा वळवल्याने नागरिकांमध्ये अधिक सतर्कता निर्माण झाली आहे.

कोंढासावळी परिसरातील भगवान ढोरे, जिवतु राऊत, पवन ढोरे, हेमराज मेश्राम, फुलचंद तुपट आणि देवीदास दुनेदार यांच्या शेत परिसरात वाघाची उपस्थिती जाणवत असल्याने संबंधित शेतकरी चिंतेत आहेत. खबरदारी म्हणून अनेक शेतकरी आता एकटे शेतात जाणे टाळत असून, गटाने शेतात जाण्याचा निर्णय घेत आहेत.

या गावांनी बाळगावी विशेष सावधानता -
पेंच व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वन विभागाने केले आहे. आवळेघाट, टेकाडी, कान्हादेवी, पेंढरी, भागीमहारी, कुसुमधरा, आमगाव, बिटोली, पेठ परसोडी, पालासावळी, बच्छेरा, नेऊरवाडा, सालई, नवेगाव खैरी आणि सुवरधरा या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पारशिवनीचे क्षेत्र सहायक जे. पी. मेंढे यांनी नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट केले आहे. विशेषतः शाळकरी मुले, गुराखी आणि शेतमजुरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाघ दिसल्यास वन विभागाला माहिती देण्याचे आवाहन -
वाघ दिसल्यास नागरिकांनी त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये किंवा मोबाइलवर छायाचित्रण करण्यासाठी धोका पत्करू नये. तातडीने वन विभागाला माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी जंगलालगतच्या भागात एकट्याने जाणे टाळावे तसेच बाहेर पडताना टॉर्चचा वापर करावा, असे वन विभागाने सांगितले आहे.

वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. वन विभागाकडून नियमित गस्त घालणे, कॅमेरा ट्रॅप बसवून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवणे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, ग्रामस्थांनी वन विभागाकडे परिसरात नियमित गस्त वाढविण्याची, अधिक कॅमेरा ट्रॅप बसविण्याची तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.






  Print






News - Nagpur




Related Photos