सर्वोत्कृष्ट शेतकरी गट पुरस्कारासाठी अर्जाचे आवाहन : १५ ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, भंडारा व कृषि विभाग, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि व संलग्न क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकरी गटांना सर्वोत्कृष्ट शेतकरी गट पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी पात्र शेतकरी गटांची निवड खुल्या स्पर्धेद्वारे करण्यात येणार असून, स्पर्धेचा कालावधी १५ ऑगस्ट २०२६ ते १५ डिसेंबर २०२६ असा राहील.
या कालावधीत शेतकरी गटांनी राबविलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे गटांचे मूल्यमापन करण्यात येईल. जैविक निविष्ठांची निर्मिती व वापर, रासायनिक खतांचा संतुलित व कमी वापर, एकात्मिक कीड व्यवस्थापन, हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा अवलंब, एकात्मिक शेती पद्धती, पीक विविधीकरण, नवोपक्रम, इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन तसेच नोंदी व दस्तऐवजीकरण आदी निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे.
स्पर्धेतील प्राप्त गुणांच्या आधारे जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १० शेतकरी गटांना प्रत्येकी २५ हजार रुपये तसेच तालुकास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रत्येकी ५ गटांना १० हजार रुपये, प्रशस्तीपत्रासह प्रदान करून गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गटाकडे आत्मा अंतर्गत शेतकरी गटाचे नोंदणी प्रमाणपत्र तसेच राष्ट्रीयकृत बँकेत गटाचे खाते असणे आवश्यक आहे. यापूर्वी आत्मा किंवा इतर कोणत्याही यंत्रणेमार्फत गट पुरस्काराचा लाभ घेतलेले गट या पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.
तसेच गटातील किमान ५० टक्के सदस्य लहान व सीमांत शेतकरी असणे बंधनकारक असून, महिला तसेच अनुसूचित जाती-जमाती SC/ST सदस्यांचेही पुरेसे प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे. विभागामार्फत वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या नियमांचे पालन करणे सर्व गटांना बंधनकारक राहील.
पात्र शेतकरी गटांनी आपले अर्ज गुगल फॉर्मद्वारे सादर करावेत. संबंधित गुगल फॉर्मची लिंक तालुका कृषि कार्यालयामार्फत उपलब्ध करून दिली जाईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२६ आहे.
अर्जासोबत शेतकरी गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, गटातील सदस्यांची यादी तसेच बँक पासबुकची प्रत किंवा रद्द धनादेश (Cancelled Cheque) जोडणे अनिवार्य आहे.
गटशेतीला चालना मिळावी, नैसर्गिक शेती व हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब व्हावा, रासायनिक निविष्ठांचा वापर कमी व्हावा आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी गटांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकल्प संचालक आत्मा उर्मिला चिखले यांनी केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




