मालमत्ता विक्री आमिषाने १.१३ कोटींची मोठी फसवणूक : रोख व धनादेश घेऊन पती-पत्नी पसार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : मालमत्ता विक्रीच्या नावाखाली विश्वास संपादन करून तब्बल १ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहारात नागपूर येथील व्यावसायिकासह त्यांच्या मित्रांची मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विनोद सोयाम व त्याची पत्नी पायल सोयाम यांच्याविरुद्ध वरोरा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील शिवसागर डेअरीचे व्यावसायिक शिवकुमार रामचंद्रजी गुप्ता ४५ वर्ष वरिष्ठ यांची काही दिवसांपूर्वी विनोद सोयाम याच्याशी ओळख झाली होती. त्यावेळी आरोपीने वरोरा येथील बंगला, तीन भूखंड, नागपूरच्या मनीषनगरमधील फ्लॅट तसेच २०० ग्रॅम सोन्याचे दागिने विक्रीस असल्याचे सांगून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्हॉट्सॲप कॉलद्वारे सातत्याने संपर्क ठेवत त्यांना वरोरा येथे बोलावण्यात आले.
२७ जुलै २०२६ रोजी तक्रारदार शिवकुमार गुप्ता हे त्यांचे मित्र रामकृष्णकुमार भुत, अब्दुल सबूर अब्दुल सत्तार आणि अशोक नंदनवार यांच्यासह वरोरा येथे पोहोचले. आरोपी विनोद सोयाम याने त्यांना स्वतःच्या घरी नेऊन संबंधित मालमत्ता दाखविली. त्यानंतर घर, तीन भूखंड, फ्लॅट आणि सोन्याचे दागिने मिळून १ कोटी १३ लाख ५० हजार रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला.
व्यवहारावर विश्वास ठेवून तक्रारदार व त्यांच्या मित्रांनी मिळून रोख ५६ लाख ५० हजार रुपये आरोपींना दिले. तसेच तक्रारदारांनी २७ लाख रुपये आणि ३० लाख रुपये असे एकूण ५७ लाख रुपयांचे दोन धनादेश विनोद सोयाम यांच्या ताब्यात दिले. मात्र, मालमत्तेची कागदपत्रे आणण्याचे सांगून आरोपी घरात गेला आणि मागील दरवाजाने रोख रक्कम व धनादेशांसह पसार झाला. काही वेळाने पायल सोयाम घरी परतल्यानंतर तिने या व्यवहाराशी आपला संबंध नसल्याचे सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. तपासानंतर वरोरा पोलिसांनी विनोद सोयाम आणि पायल सोयाम यांच्याविरुद्ध फसवणुकीसह संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या आर्थिक गुन्ह्यामागील संपूर्ण व्यवहार, आरोपींची भूमिका तसेच रकमेचा मागोवा घेण्याचे काम सुरू असून, आरोपींना अटक करण्यासाठी वरोरा पोलिसांकडून शोधमोहीम राबविण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




