महत्वाच्या बातम्या

 स्मार्ट मीटर सक्ती, बोगस व अवाजवी वीज बिलांविरोधात महावितरण कार्यालयावर आसपा-माकपचा हल्लाबोल


- शेकडो वीज ग्राहकांचा संताप; अधीक्षक अभियंत्यांना आंदोलनस्थळी बोलावून विचारला जाब, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा इशारा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर सक्ती, बोगस व अवाजवी वीज बिल आकारणी, अंदाजे बिले, ग्राहकांच्या तक्रारींकडे होत असलेले दुर्लक्ष आणि बेजबाबदार कारभाराच्या निषेधार्थ आजाद समाज पार्टी (आसपा) आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या (माकप) वतीने गुरुवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर तीव्र हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध भागांतील शेकडो नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या आणि तक्रारी प्रशासनासमोर मांडल्या. अवाजवी वीज बिलांच्या प्रती हातात घेऊन नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याने परिसरात तीव्र जनआक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते.

आंदोलनादरम्यान महावितरणच्या कथित मनमानी कारभाराची अनेक उदाहरणे नागरिकांनी समोर आणली. गडचिरोली शहरातील दुर्गा कुरजेकर यांना घरगुती वापरासाठी तब्बल ९९ हजार ५४० रुपयांचे वीज बिल आल्याची धक्कादायक बाब यावेळी मांडण्यात आली. तर वाघोली येथील ७० वर्षीय वृद्ध महिला शेवंता कुमरे यांना २७ हजार रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याचा प्रकारही समोर आला. विशेष म्हणजे, त्या एकट्याच एका छोट्याशा कवेलूच्या घरात वास्तव्यास असून घरात केवळ दोन दिवे असतानाही एवढी प्रचंड रक्कम आकारण्यात आल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला.

याहून गंभीर बाब म्हणजे, संबंधित बिलाची रक्कम भरली नसल्याच्या कारणावरून महावितरणने त्यांच्या घराची वीज जोडणी खंडित केल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून त्या वृद्ध महिलेला अंधारात जीवन जगावे लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. हा प्रकार अत्यंत अमानवी, असंवेदनशील आणि ग्राहकविरोधी असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन महावितरणचे अधीक्षक अभियंता यांना थेट आंदोलनस्थळी बोलावण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या आणि तक्रारी अधिकाऱ्यांसमोर मांडत जाब विचारला. अधीक्षक अभियंत्यांनी विविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणतेही स्पष्ट आश्वासन किंवा तातडीच्या कार्यवाहीबाबत ठोस भूमिका मांडली नसल्याचा आरोप आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी केला.

महावितरण प्रशासनाकडून सातत्याने तपास करू, पुढे पाहू अशा स्वरूपाची गोलमोल उत्तरे देऊन जनतेच्या प्रश्नांची टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

आसपा आणि माकपच्या वतीने यावेळी अवाजवी वीज बिल आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या घरी प्रत्यक्ष मौका चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित मीटर, रीडिंग, बिलिंग पद्धती, अंदाजे आकारणी आणि चुकीच्या देयकांची सखोल तपासणी करून तत्काळ सुधारित कार्यवाही करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर दबाव टाकणे, जुन्या मीटरचे रीडिंग न घेता अंदाजे बिले आकारणे, तक्रारींकडे दुर्लक्ष करणे आणि गरीब, शेतकरी व वृद्ध नागरिकांना आर्थिक कोंडीत ढकलणे हे प्रकार तात्काळ बंद करावेत, अशी मागणी करण्यात आली.

सुमारे दोन तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या या आंदोलनादरम्यान घोषणाबाजी, निवेदन सादरीकरण, पीडित ग्राहकांच्या समस्या मांडणे आणि अधिकाऱ्यांशी थेट प्रश्नोत्तरांचा सामना अशा विविध माध्यमांतून प्रशासनाविरोधातील संताप व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या प्रश्नांच्या भडिमारामुळे अधीक्षक अभियंत्यांना चांगलाच घाम फुटल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यावेळी अधीक्षक अभियंत्यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांना सविस्तर निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात गडचिरोली जिल्ह्यातील वीज ग्राहकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती देत तातडीने हस्तक्षेप करून समस्यांचे निराकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी महावितरणवर गंभीर आरोप करत इशारा दिला. महावितरणने ग्राहकांना सेवा देण्याऐवजी त्यांची आर्थिक लूट, मानसिक छळ आणि प्रशासकीय पिळवणूक सुरू केली आहे. गरीब, शेतकरी, वृद्ध महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या घरात अंधार करून, अवाजवी बिले देऊन आणि तक्रारी दाबून ठेवून महावितरण जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर आजाद समाज पार्टी हे मुळीच सहन करणार नाही. गडचिरोलीतील प्रत्येक वीज ग्राहकाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील, असे ते म्हणाले.

आसपा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने महावितरणने तात्काळ ग्राहकांच्या तक्रारींची प्रत्यक्ष चौकशी करून बोगस व अवाजवी बिले दुरुस्त करावीत, वृद्ध व गरीब नागरिकांवरील अन्याय थांबवावा आणि स्मार्ट मीटरच्या नावाखाली सुरू असलेली सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा हा लढा अधिक व्यापक, तीव्र आणि जिल्हाभर उग्र स्वरूपात उभा करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात आजाद समाज पार्टीचे प्रदेश सचिव धर्मानंद मेश्राम, जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अमोल मारकवार, जिल्हा प्रवक्ते प्रितेश अंबादे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. प्रशांत सातार, युवा अध्यक्ष विकी खोब्रागडे, जिल्हा सचिव प्रकाश बन्सोड, कोषाध्यक्ष नागसेन खोब्रागडे, आरमोरी युवा अध्यक्ष लकी पाटील, वडसा युवा अध्यक्ष मंगेश बन्सोड, महिला अध्यक्ष सोनाशी लभाने यांच्यासह धनराज दामले, नितेश वेस्कडे, सतीश दुर्गमवार, शोभा खोब्रागडे, सविता बांबोळे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध गावांतील वीज ग्राहक, महिला, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos