मधमाशी पालनातून ग्रामीण युवकांना स्वावलंबनाची संधी


- खादी व ग्रामोद्योग मंडळाची मध केंद्र; योजना; प्रशिक्षण, ५० टक्के अनुदान आणि मधाला हमीभावाची सुविधा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र (मधमाशी पालन) योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाला चालना देत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने ही योजना राज्यभर राबविण्यात येत असून, पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण, अनुदान आणि उत्पादित मधासाठी हमीभावाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक मधपाळ, केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) आणि केंद्र चालक संस्था अशा तीन गटांमध्ये लाभ दिला जातो. निवड झालेल्या लाभार्थ्यांना मधमाशी पालन व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते. तसेच मधपेट्या, मध काढण्याची यंत्रे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी ५० टक्के शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादित मधासाठी शासनाकडून हमीभाव निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे उत्पादकांना बाजारपेठ शोधण्याची किंवा विक्रीची चिंता न करता उत्पादनावर भर देता येतो. यामुळे मधमाशी पालन हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि शाश्वत रोजगाराचा पर्याय ठरत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. वैयक्तिक मधपाळ गटासाठी किमान साक्षरता अपेक्षित असून स्वतःची शेती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी आवश्यक ५० टक्के स्वगुंतवणुकीची रक्कम मंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
या योजनेची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुक शेतकरी, युवक आणि संस्थांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भास्कर मेश्राम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच हेमंत राऊत, मधुक्षेत्रिक (मो. ८४५९१६०६०४) यांच्याशी संपर्क साधता येईल.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी, बेरोजगार युवक तसेच स्वयंसेवी संस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मधमाशी पालन व्यवसायाद्वारे स्वावलंबी होण्याचे आवाहन केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




