महत्वाच्या बातम्या

 तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीसाठी सदस्य नियुक्ती : इच्छुकांकडून अर्ज मागविले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण आणि पथविक्री विनियमन अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन नियम, २०१६ मधील तरतुदीनुसार भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी, साकोली, लाखनी, लाखांदूर आणि मोहाडी या सात स्थानिक प्राधिकरणांसाठी तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अधिनियमाच्या कलम २० (१) नुसार दिवाणी न्यायाधीश किंवा न्यायदंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी समिती स्थापन करण्यात येणार असून, प्रत्येक समितीवर दोन पात्र सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.

सदस्यपदासाठी अर्जदाराचे वय ३५ ते ६५ वर्षांदरम्यान असावे. मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी. स्थानिक प्राधिकरणातील कामाचा अनुभव तसेच शासनाच्या अवर सचिव किंवा तत्सम अथवा त्यापेक्षा उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याच्या समकक्ष पदावर स्थानिक स्वराज्य संस्थेत काम केलेले असावे.

याशिवाय कार्यकुशलता, सचोटी, प्रतिष्ठा तसेच सामाजिक कार्य, पथविक्रेते, सार्वजनिक कामे किंवा नागरी व सार्वजनिक प्रशासनाशी संबंधित समस्यांचे किमान दहा वर्षांचे ज्ञान अथवा अनुभव असणे आवश्यक आहे.

पात्र इच्छुकांनी संपूर्ण बायोडाटा तसेच आवश्यक कागदपत्रांच्या स्वाक्षांकित प्रतींसह आपला अर्ज नगर विकास शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे कार्यालयीन वेळेत दहा दिवसांच्या आत सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

समितीवरील नियुक्त सदस्यांना शासनाकडून वेळोवेळी अधिसूचित करण्यात येणारे वेतन, भत्ते व इतर परिलब्धी देण्यात येतील. समितीवरील सदस्यांच्या नियुक्तीबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी, भंडारा यांचा राहील.





  Print






News - Bhandara




Related Photos