फुलेवॉर्ड परिसरात देशी दारूची अवैध वाहतूक उघड : दोघांना अटक, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरातील फुलेवॉर्ड परिसरात दुचाकीवरून देशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री ११.१७ वाजता करण्यात आलेल्या या कारवाईत देशी दारूसह दोन मोपेड दुचाकी असा एकूण २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहील नंदू गेडाम २२ वर्षे आणि हितेश नीलकंठ ढवळे १९ वर्षे दोघेही रा. ढिवर मोहल्ला, गडचिरोली यांचा समावेश आहे.
पोलिसांना फुलेवॉर्ड परिसरातून दुचाकीवरून देशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार गस्तीदरम्यान पोलिसांनी फुलेवॉर्ड परिसरात सापळा रचून संशयित दुचाकींची तपासणी केली. तपासणीदरम्यान दोघांकडे मोठ्या प्रमाणात देशी दारूचा साठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडील देशी दारू आणि दुचाकी जप्त केल्या.
या कारवाईत ४८ हजार रुपयांची देशी दारू, ८० हजार रुपये किमतीची मोपेड एमएच ३३ एके ९४६६ आणि ८० हजार रुपये किमतीची मोपेड एमएच ३३ एजे ९०४७ असा एकूण २ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस अंमलदार नरेश मेश्राम यांच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




