दारूसह २.३७ लाखांचा मुद्देमाल जप्त : एक अटकेत, दोघे फरार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहर व परिसरातील अवैध दारूविक्री व तस्करीविरोधात गडचिरोली पोलिसांनी २४ व २५ जुलै रोजी सलग दोन धडक कारवाया करून एकूण २ लाख ३७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवायांमध्ये दोन दुचाकींसह देशी-विदेशी दारूचा साठा हस्तगत करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून, अंधाराचा फायदा घेत पसार झालेल्या दोन आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
पहिली कारवाई २४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शहरातील आयटीआय चौक परिसरातील एका गेस्ट हाऊस व इंटरनेट कॅफेजवळ करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून हितेश सुकरू शेडमाके ३० वर्ष , रा. नवेगाव याला ताब्यात घेतले. त्याच्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून विदेशी दारूच्या चार निपा जप्त करण्यात आल्या. या दारूची किंमत सुमारे १ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, दुसरी कारवाई २५ जुलैच्या मध्यरात्री कोटगल हेटी मार्गावर करण्यात आली. या मार्गावर दुचाकीवरून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित दुचाकीला थांबण्याचा इशारा केला. मात्र, रोशन कुंभारे (रा. इंदाळा टोली) व कुमोद रामचंद्र मादेश्वर (रा. कोटगल हेटी) यांनी पोलिसांना पाहताच दुचाकी व दारूची पोती रस्त्याच्या कडेला टाकून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी टाकून दिलेल्या मालाची तपासणी केली असता देशी दारूच्या ८० निपा (किंमत ६,४०० रुपये), अन्य २४ निपा (किंमत ९,६०० रुपये) तसेच अंदाजे दीड लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, त्यांचा शोध सुरू आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी कोटगल हेटी येथे गावातील महिलांनी अवैध दारूविक्री बंद करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर पोलिसांनी या भागातील अवैध दारूविक्री आणि तस्करीविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, पुढील काळातही अशा कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




