महत्वाच्या बातम्या

 एलसीबीची जटपुरा गेट परिसरात कारवाई : एमडी ड्रग्जसह दोघांना अटक, ६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : शहरातील जटपुरा गेट परिसरात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या अवैध व्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठा घाव घालत एमडी (मेफेड्रोन) या घातक अमली पदार्थासह दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत १०४.२१० ग्रॅम एमडी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण ६ लाख २३ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ओम संतोष इटनकर (वय २५) रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर व इरफान उर्फ भुऱ्या पठाण रा. बागलखिडकी, चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे.

२५ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेला जटपुरा गेट परिसरात एमडी अमली पदार्थांची विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची पडताळणी केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने इटनकर पान मंदिर परिसरात सापळा रचला. संशयित हालचाली आढळल्यानंतर पोलिसांनी ओम संतोष इटनकर (वय २५(, रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर याला ताब्यात घेतले.

त्यानंतर आरोपीची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच त्याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली असता १०४.२१० ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ, तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कम आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या सर्व साहित्याची किंमत ६ लाख २३ हजार ३०० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपी ओम इटनकर याने सदर अमली पदार्थ इरफान उर्फ भुऱ्या पठाण रा. बागलखिडकी, चंद्रपूर याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि इतर पुरावे गोळा करून इरफान उर्फ भुऱ्या पठाण यालाही ताब्यात घेतले. पुढील चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली.

या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध अमली पदार्थ व मन:प्रभावी पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) १९८५ अंतर्गत कलम ८ (सी), २२ (सी) व २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ नेमका कुठून आणण्यात आला, त्याचा पुरवठा कोणाकडून केला जात होता तसेच या अवैध व्यवसायातून झालेल्या आर्थिक व्यवहारांचा तपास सध्या सुरू आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकार, संतोष निंभोरकर, डोके, पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनीकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इम्रान खान, सुनील आत्राम, पोअं हिरालाल गुप्ता, किशोर वाकाटे, शशांक बदामबार, प्रतीक हेमके, मपोहवा छापा, मपोअं अपणों (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) तसेच श्वान पथकातील पोहवा राजेश किन्नाके व विनोद चव्हाण यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos