महत्वाच्या बातम्या

 माजी खासदार डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस उद्या सेवाभावी उपक्रमांनी साजरा : गडचिरोलीत विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांचा वाढदिवस बुधवार, १ जुलै २०२६ रोजी नेहमीप्रमाणे अत्यंत साधेपणाने आणि सेवा भाव जपून विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरात वृक्षारोपण, वृद्धाश्रम भेट, रुग्णालयात भोजन व फळ वाटप तसेच अभिष्टचिंतन सोहळा असे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

डॉ. अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले असून, पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याचा संदेश या कार्यक्रमांतून दिला जाणार आहे. हा वाढदिवस कोणत्याही दिखाऊ स्वरूपात न साजरा करता पूर्णपणे सेवाभावी उपक्रमांवर आधारित ठेवण्यात आला आहे.

असा असेल वाढदिवस सेवा कार्यक्रम -
सकाळी ८.०० वाजता चामोर्शी रोडवरील जनसंपर्क कार्यालय, गडचिरोली येथे भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रपरिवार एकत्रित जमणार आहे.

त्यानंतर सकाळी ९.०० वाजता गडचिरोलीचे आराध्य दैवत असलेल्या सेमाना देवस्थान येथे दर्शन व पूजा-अर्चा करण्यात येईल. यानंतर परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जाणार आहे.

सकाळी १०.०० वाजता चामोर्शी रोडवरील वृद्धाश्रमात जाऊन ज्येष्ठ नागरिकांची भेट घेण्यात येणार असून, त्यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून त्यांच्यासोबत वाढदिवस साजरा केला जाणार आहे.

यानंतर सकाळी ११.३० वाजता गांधी चौक येथील महिला व बाल रुग्णालयात एक घास माणुसकीचा या उपक्रमांतर्गत रुग्णांच्या नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात येईल. तसेच रुग्णांना फळांचे वितरण करून त्यांना शुभेच्छा देण्यात येतील.

दिवसभरातील कार्यक्रमांची सांगता सायंकाळी ६.०० वाजता गडचिरोली-चामोर्शी महामार्गावरील गोविंदपूर येथील विला अर्बन फॅमिली हॉटेल अँड रेस्टॉरंट (धाबा) येथे होणाऱ्या अभिष्टचिंतन सोहळ्याने होणार आहे. या वेळी उपस्थित मान्यवर डॉ. अशोक नेते यांना दीर्घायुष्य व निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतील.

डॉ. अशोक नेते यांचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा प्रसंग नसून समाजसेवेचा संकल्प असल्याचे संयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, महिला आघाडी, युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच कार्यकर्त्यांनी या सर्व सेवाभावी कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos