महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर-यवतमाळमधील प्रदूषण नियंत्रणासाठी त्रिस्तरीय कृती आराखडा प्रभावीपणे राबवा : पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे स्पष्ट निर्देश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणी, कोल वॉशरीज आणि कोळशाच्या वाहतुकीमुळे वाढत असलेल्या हवेच्या व पाण्याच्या प्रदूषणावर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समन्वित कृती आराखडा तातडीने राबविण्यात यावा, असे निर्देश पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. केवळ बैठका आणि चर्चांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीवर भर देण्याचे स्पष्ट निर्देश देत त्यांनी उद्योगांना वेळबद्ध आराखडा तयार करण्यास सांगितले.

मुंबई येथे चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील कोळसा खाणी व कोल वॉशरीज क्षेत्रातील उद्योगपतींच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत मंत्री मुंडे बोलत होत्या. बैठकीत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, चंद्रपूर विभागाचे विभाग समन्वयक डॉ. विश्वजीत ठाकूर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध कोळसा खाण व कोल वॉशरीज कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रदूषणाची सद्यस्थिती, त्यामागील प्रमुख कारणे आणि त्यावर राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. त्यानंतर पर्यावरणमंत्री मुंडे यांनी उद्योगांना प्रदूषण नियंत्रणासाठी अधिक जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले.

त्या म्हणाल्या की, चंद्रपूर परिसरातील प्रदूषणाचे प्रमुख स्रोत म्हणजे कोळसा खाणी, कोल वॉशरीज आणि कोळशाची वाहतूक. विशेषतः रस्तेमार्गे होणाऱ्या कोळसा वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होऊन हवेच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे भविष्यात शक्य तितक्या प्रमाणात रेल्वे, कन्व्हेयर बेल्ट आणि झाकलेल्या कन्व्हेयर प्रणालीद्वारे कोळशाची वाहतूक करण्यावर भर द्यावा.

मंत्री मुंडे यांनी उद्योगांना पुढील तीन महिन्यांत राबविण्यात येणाऱ्या अल्पकालीन उपाययोजनांचा सविस्तर कृती आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. या आराखड्यात धूळ नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना, वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धन, जनजागृती कार्यक्रम तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपायांचा समावेश असावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

कोळसा खाणी आणि कोल वॉशरीज परिसरात आवश्यक त्या ठिकाणी बफर झोन विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यामुळे परिसरातील नागरिकांवर होणारा प्रदूषणाचा परिणाम कमी होण्यास मदत होईल. उद्योगांनी पर्यावरण संवर्धनाची सामाजिक जबाबदारी स्वीकारून आपल्या कार्यक्षेत्रातील पर्यावरणीय स्थिती सुधारण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) पर्यावरण संवर्धनासाठी प्रभावीपणे वापरण्याचे आवाहन करताना मंत्री मुंडे म्हणाल्या की, उद्योगांनी वृक्षारोपण, आरोग्य सुविधा, शाळा, रस्ते आणि गावांतील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी सीएसआर निधीचा वापर करावा. शासनाच्या माध्यमातून आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांबाबत उद्योगांनी प्रस्ताव सादर करावेत. शासनाकडून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल.

चंद्रपूर आणि यवतमाळचा औद्योगिक विकास महत्त्वाचा असला तरी नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षण ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. प्रदूषण नियंत्रणाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक उद्योगाने पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असेही मंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

प्रदूषण नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा परिणाम मोजण्यासाठी काम सुरू करण्यापूर्वीची आणि काम पूर्ण झाल्यानंतरची स्थिती छायाचित्रे व अन्य नोंदींच्या माध्यमातून जतन करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक उपाययोजनेचा प्रत्यक्ष परिणाम तपासणे सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल)च्या प्रतिनिधींनी ४०० हेक्टर क्षेत्रावर सुमारे दोन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजनांचे सविस्तर सादरीकरण केले.

प्रदूषण नियंत्रणासाठी प्रस्तावित उपाययोजना -
अल्पकालीन : तातडीने राबविता येणाऱ्या तांत्रिक उपाययोजना, धूळ नियंत्रण, कोळसा सायडिंग आणि वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा.
मध्यमकालीन : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (ईटीपी/एसटीपी), औष्णिक व रासायनिक कचरा व्यवस्थापन आणि हरित पट्ट्यांचा विस्तार.
दीर्घकालीन : शाश्वत तंत्रज्ञानाचा अवलंब, स्वच्छ ऊर्जा स्रोतांचा वापर, झिरो लिक्विड डिस्चार्ज संकल्पनेची अंमलबजावणी आणि कमीत कमी उत्सर्जन करणाऱ्या औद्योगिक प्रणालीचा स्वीकार.





  Print






News - Chandrapur




Related Photos