महत्वाच्या बातम्या

 अवैध दारू विक्रेत्यांविरोधात ‘ऑपरेशन वॉश आऊट’; चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

जिल्हा प्रतिनिधी/चंद्रपूर :अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतुकीवर आळा घालण्यासाठी चंद्रपूर शहर पोलिसांनी शुक्रवारी पहाटे विशेष ‘ऑपरेशन वॉश आऊट’ मोहीम राबवत मोठी कारवाई केली. पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ६ वाजताच्या सुमारास महाकाली कॉलरीसह विविध भागांत छापेमारी करण्यात आली.या मोहिमेदरम्यान दारूबंदी कायद्यान्वये तब्बल १० वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या असून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. यात ६०० लिटर महुआ सडवा, २३५ लिटर महुआ दारू, ५० नग देशी दारू तसेच १५ नग विदेशी दारूचा समावेश आहे.पोलिसांनी आवश्यक नमुने घेतल्यानंतर अवैध दारू जागीच नष्ट केली. कारवाईत हातभट्टी दारू, मोहाची दारू, देशी व विदेशी मद्याचा मोठा साठा उघडकीस आला. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या छाप्यांमध्ये हजारो रुपयांची दारू जप्त करून संबंधित आरोपींविरुद्ध दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणात आरोपी महिला विमल प्रसाद कोतपलीवार (वय ४०) व सुनीता राकेश शेगमवार (वय ४५), रा. आनंदनगर, महाकाली वॉर्ड यांच्यासह अन्य संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे.चंद्रपूर शहर पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शहरात अवैध दारू विक्री, निर्मिती व वाहतुकीविरोधात यापुढेही सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात करण्यात आली.





  Print






News - Chandrapur




Related Photos