नाबालक दुचाकी चालकांवर बल्लारपूर वाहतूक पोलिसांचा धडक कारवाईचा बडगा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : शहरात नाबालकांकडून दुचाकी चालविण्याचे वाढते प्रमाण आणि त्यातून उद्भवणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर वाहतूक शाखेने कठोर भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी एमडी (मादक पदार्थ) प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातील दुचाकी जप्त करण्यात आल्याच्या घटनेनंतर पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी वाहतूक पोलिसांना नाबालक दुचाकी चालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.
या निर्देशानुसार वाहतूक पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी तपासणी मोहीम सुरू केली असून, नाबालक चालकांना थांबवून त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जात आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात येत आहे.
दरम्यान, २९ जुलै रोजी शहरातील एका मार्गावर तीन नाबालक एकाच दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते घाबरून भरधाव वेगाने पळून गेले. मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून संबंधित दुचाकी अडविली आणि तिघांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करत चालान केले.
वाहतूक शाखेने या मोहिमेदरम्यान नाबालक चालकांना वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगत भविष्यात वाहन चालवू नये, अशी तंबी दिली. याशिवाय पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहनाची चावी देणे टाळावे, अन्यथा वाहनमालक आणि पालकांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांनी सांगितले की, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, नाबालक चालक, ट्रिपल सीट प्रवास, विनाहेल्मेट वाहनचालक तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.
News - Chandrapur




Petrol Price




