महत्वाच्या बातम्या

 राजेंद्र चिकटे यांची वरोरा तालुका काँग्रेस अध्यक्षपदी, तर निलेश भालेराव यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती


- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियुक्त्या जाहीर; संघटन बळकटीसाठी नव्या नेतृत्वावर पक्षाचा विश्वास

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने वरोरा तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. त्यानुसार वरोरा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र चिकटे, तर वरोरा शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निलेश भालेराव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांचे तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून पक्ष संघटनेला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नवनियुक्त तालुकाध्यक्ष राजेंद्र चिकटे हे चारगाव (खुर्द) ग्रामपंचायतीचे गेल्या दहा वर्षांपासून सरपंच म्हणून कार्यरत आहेत. ग्रामीण विकास, शेतकरी प्रश्न आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील त्यांच्या सक्रिय कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असून सध्या संचालक म्हणून कार्यरत आहेत. तसेच ग्राम संवाद सरपंच संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणूनही ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा आणि संघटन कौशल्याचा पक्षाला निश्चितच लाभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहराध्यक्षपदी नियुक्त झालेले निलेश भालेराव हे वरोरा शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि युवक संघटनांशी सक्रियपणे जोडलेले आहेत. सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी शहरात युवा नेतृत्व म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. युवकांमध्ये त्यांचा चांगला संपर्क असून संघटन उभारणीत ते सक्रिय राहिले आहेत.

राजेंद्र चिकटे आणि निलेश भालेराव हे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तसेच ते खासदार प्रतिभा धानोरकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी या दोन्ही पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे.

या नियुक्त्यांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील काँग्रेस संघटनांना नवे नेतृत्व मिळाले असून, पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, नव्या कार्यकर्त्यांना संधी देणे आणि जनसामान्यांचे प्रश्न प्रभावीपणे मांडणे या दिशेने दोन्ही नवनियुक्त अध्यक्ष कार्य करतील, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos