दिना प्रकल्पात ६२.५७ टक्के जलसाठा : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यातील शेतीसाठी जीवनदायिनी मानल्या जाणाऱ्या दिना प्रकल्पातील पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचल्याने खरीप हंगामातील सिंचनाबाबत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रकल्पात एकूण उपयुक्त क्षमतेच्या ६२.५७ टक्के जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता विकास दुधबावरे यांनी दिली.
जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २२ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत दिना प्रकल्पाची जलपातळी २२८.७४ मीटर इतकी नोंदविण्यात आली. प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ४२.२६ दशलक्ष घनमीटर असून, तो प्रकल्पाच्या एकूण उपयुक्त क्षमतेच्या ६२.५७ टक्के आहे. प्रकल्पाची पूर्ण जलपातळी २३०.५७ मीटर असून, प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता ७२.७५ दशलक्ष घनमीटर, तर उपयुक्त साठवण क्षमता ६७.५४ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
यंदाच्या मान्सून हंगामात १ जूनपासून २२ जुलैपर्यंत प्रकल्प परिसरात २४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, २२ जुलै रोजी पावसाची नोंद शून्य होती. असे असतानाही पूर्वी झालेल्या पावसामुळे प्रकल्पातील जलसाठा समाधानकारक राहिला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाची परिस्थिती अधिक आशादायक असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. २२ जुलै २०२५ रोजी दिना प्रकल्पात २९.१२ दशलक्ष घनमीटर, म्हणजेच ४३.१२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. त्या तुलनेत यंदा जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने खरीप हंगामातील सिंचनाची उपलब्धता अधिक सक्षम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिना प्रकल्प हा चामोर्शी तालुक्यातील शेतीसाठी महत्त्वाचा जलस्रोत मानला जातो. त्यामुळे प्रकल्पातील वाढलेला पाणीसाठा भातासह विविध खरीप पिकांसाठी लाभदायक ठरणार असून, आगामी काळात समाधानकारक पाऊस झाल्यास जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




