महत्वाच्या बातम्या

 गोंदियातील वीज समस्या कमी होणार : सिव्हिल लाइन व चंगेरा येथे नवीन विद्युत उपकेंद्रांना मंजुरी


- १३ कोटींच्या प्रकल्पामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना मिळणार मोठा दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : गेल्या अनेक वर्षांपासून वीजपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जाणाऱ्या गोंदिया शहर आणि ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. शहरातील सिव्हिल लाइन आणि तालुक्यातील चंगेरा येथे ३३/११ केव्ही क्षमतेच्या दोन नवीन विद्युत उपकेंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. या उपकेंद्रांमुळे वीज वितरण व्यवस्थेवरील भार कमी होऊन ग्राहकांना अधिक दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळणार असल्याची माहिती आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.

गोंदिया शहरातील सिव्हिल लाइन येथील हनुमान मंदिरासमोर सुमारे ८ कोटी रुपये खर्चून नवीन ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील चंगेरा येथे ५ कोटी रुपये खर्चाचे ३३ केव्ही क्षमतेचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे शहर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे.

आमदार विनोद अग्रवाल यांनी सांगितले की, वीज समस्या दूर करण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नवीन उपकेंद्रांसोबतच जुन्या विद्युत उपकेंद्रांची भारवाहक क्षमता वाढविणे आणि विद्युत केबलिंगमध्ये आवश्यक बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे वीज वितरण प्रणाली अधिक सक्षम होणार आहे.

चंगेरा उपकेंद्रामुळे पाच किलोमीटर परिसरातील गावांना फायदा -
चंगेरा येथे नवीन विद्युत उपकेंद्र उभारल्यानंतर परिसरातील सुमारे पाच किलोमीटरच्या परिघातील गावांना दर्जेदार आणि सुरळीत वीजपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे. या उपकेंद्रामुळे झिलमिली, रावणवाडी आणि काटी येथील विद्यमान उपकेंद्रांवरील भार कमी होणार असून, तेथील वीजपुरवठा अधिक स्थिर होईल.

याशिवाय कोरणी, सतोना, जिरुटोला, बनाथर, कोचेवाही, मोठे रजेगाव, छोटे रजेगाव आदी अनेक गावांतील कमी लोडमुळे निर्माण होणाऱ्या वीज समस्येवरही तोडगा निघणार आहे.

सिव्हिल लाइन उपकेंद्रामुळे शहरातील वीज व्यवस्था सुधारणार -
गोंदिया शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येणाऱ्या सिव्हिल लाइन विद्युत उपकेंद्रामुळे शहरातील वीज व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. वाढती लोकसंख्या आणि वाढत्या विजेच्या मागणीमुळे जुन्या यंत्रणेवर येणारा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

सिव्हिल लाइन, चंगेरा, बटाना, फुलचूर आणि भीमघाट येथे नवीन उपकेंद्रांना मंजुरी मिळाल्यानंतर कटंगटोला, रापेवाडा, रावणवाडी, झिलमिली आणि हिवरा येथील उपकेंद्रांची भारवाहक क्षमता दुप्पट करण्यात आल्याची माहितीही आमदार विनोद अग्रवाल यांनी दिली.

वीज वितरण व्यवस्थेला मिळणार बळकटी -
नवीन उपकेंद्रे, वाढीव भारवाहक क्षमता आणि केबलिंगमधील सुधारणा यामुळे गोंदिया शहरासह ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे. परिणामी, ग्राहकांना भविष्यात अधिक विश्वासार्ह आणि अखंडित वीजपुरवठा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gondia




Related Photos