महत्वाच्या बातम्या

 मोबाईलच्या हट्टातून शोकांतिका : मुलाच्या मारहाणीनंतर वडिलांचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मोबाईल खरेदीच्या कारणावरून झालेला कौटुंबिक वाद एका कुटुंबासाठी शोकांतिका ठरला असून, मुलाने केलेल्या मारहाणीमुळे वडिलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोरपना तालुक्यातील टांगारा येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी १६ वर्षे ४ महिने वयाच्या विधीसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, टांगारा येथील सुरेश नायकू कोडापे ( ३८) यांचा २१ मे २०२६ रोजी मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोरपना पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक १३/२६ दाखल करून चौकशी सुरू करण्यात आली होती.

मर्ग चौकशीदरम्यान मृतकाचा भाऊ रविंद्र कोडापे, वडील नायकू कोडापे, आई मिमबाई कोडापे तसेच पत्नी जंगुबाई कोडापे यांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी सायंकाळी मोबाईल घेण्याच्या कारणावरून सुरेश कोडापे आणि त्यांचा मुलगा यांच्यात वाद झाला होता. या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटावर लाथा व हाताबुक्क्यांनी वारंवार मारहाण केल्याचे तपासात समोर आले.

मारहाणीनंतर सुरेश कोडापे यांना पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला होता. त्यानंतर २१ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात पोटातील अंतर्गत अवयवांना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलीस चौकशी, साक्षीदारांचे जबाब आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे मृत्यूला कारणीभूत ठरलेली मारहाण विधी संघर्ष बालकाने  केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कोरपना पोलीस ठाण्याच्या ठाणेदार लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक देवानंद केकन करीत आहेत. या घटनेमुळे टांगारा गावात हळहळ व्यक्त होत असून, मोबाईलच्या किरकोळ वादातून एका व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos