चालकाला डुलकी अन् कार कालव्यात : वृद्धेचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी


- सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोलीजवळ मध्यरात्री भीषण अपघात; नातवाची भेट ठरली अखेरची
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : चालकाला डुलकी आल्याने कारवरील नियंत्रण सुटून ती पुलाचे कठडे तोडत कालव्यात कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली शेतशिवारात सोमवारी २७ मध्यरात्री सुमारे १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
या अपघातात लीला रेखलाल गौतम ६५ वर्षे, रा. साखरीटोला-सातगाव यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा विजय रेखलाल गौतम ४८, सून सरिता विजय गौतम ४० वर्षे, रा. साखरीटोला आणि कारचालक यश लक्षणे २५, रा. आमगाव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गौतम कुटुंब कार (क्र. एमएच-३५ एजे-३७७७) ने नागपूर येथे विजय गौतम यांच्या मुलाला भेटण्यासाठी गेले होते. विजय यांचा मुलगा नागपूर येथील मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, लीला आपल्या मुलगा आणि सुनेसह नातवाची भेट घेण्यासाठी नागपूरला गेल्या होत्या. नातवासोबत वेळ घालवल्यानंतर सर्वजण रात्री उशिरा साखरीटोलाकडे परत निघाले होते.
दरम्यान, सालेकसा-देवरी मार्गावरील हरदोली गावाजवळ मध्यरात्री सुमारे १२.३० वाजता चालक यश लक्षणे याला डुलकी आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कारवरील त्याचा ताबा सुटला आणि भरधाव कारने पुलाचे कठडे तोडत थेट खाली कालव्यात कोसळली. अपघाताचा जोर इतका भीषण होता की, लीला गौतम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमी विजय गौतम यांनी आपल्या वडिलांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेला संपर्क करण्यात आला. घटनास्थळी पोहोचलेल्या रुग्णवाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत कालव्यात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले आणि त्यांना तातडीने गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, लीला गौतम यांच्या मृतदेहाचे उत्तरीय तपासणी (शवविच्छेदन) करण्यात आल्यानंतर तो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
नातवाची भेट ठरली अखेरची -
या दुर्दैवी घटनेने गौतम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लीला गौतम या आपल्या नातवाला भेटण्यासाठी मोठ्या आनंदाने नागपूरला गेल्या होत्या. मात्र, परतीच्या प्रवासात घरापासून काही अंतरावरच झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नातवाची ही भेट त्यांच्या आयुष्यातील अखेरची भेट ठरली. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सालेकसा पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार चालकाला आलेली डुलकी हे अपघातामागील प्रमुख कारण असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
News - Gondia




Petrol Price




