महत्वाच्या बातम्या

 घोट येथे अप्पर तहसील कार्यालयासह बंगाली बांधवांच्या मागण्यांसाठी महसूल मंत्र्यांकडे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांचा पाठपुरावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या समाधानासाठी तसेच बंगाली बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून, याच अनुषंगाने कोराडी (जि. नागपूर) येथे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुडे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे  यांनी दिली.

या भेटीदरम्यान घोट परिसरातील प्रमुख कार्यकर्ते तसेच बंगाली समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. चामोर्शी तालुक्यातील सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या घोट परिसरातील नागरिकांना महसूल प्रशासनाशी संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याने, आष्टी कार्यालयासोबतच घोट येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय तात्काळ मंजूर करण्यात यावे, अशी आग्रही मागणी महसूल मंत्र्यांकडे करण्यात आली.

यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ४८ बंगाली गावांच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. तसेच पुनर्वसित बंगाली बांधवांच्या वर्ग-२ शेतजमिनींचे विनामूल्य वर्ग-१ मध्ये रूपांतर करून त्यांना मालकी हक्क प्रदान करावा, अशी मागणीही मांडण्यात आली. याशिवाय विधानसभा क्षेत्रातील ८२ नवीन तलाठी कार्यालयांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या सर्व महत्त्वपूर्ण विषयांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, शासन स्तरावरून योग्य ती कार्यवाही करून निर्णय प्रक्रियेला गती देण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी सांगितले.

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना न्याय व विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी असा पाठपुरावा भविष्यातही सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos