महत्वाच्या बातम्या

 मुलचेरा (गडचिरोली) वनविभागात लाचप्रकरणाचा मोठा खुलासा : एसीबीची कारवाई, एक जण रंगेहात अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील पेडीगुडम वनपरिक्षेत्रात कथित लाचप्रकरण उघडकीस आल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. फर्निचर व्यवसायिकाकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून झालेल्या या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून एकास रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण वनविभागात चर्चेला उधाण आले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडेही आता लक्ष वेधले जात आहे.

तीन लाखांची मागणी, ५० हजारांचा पहिला हप्ता ठरला -
मिळालेल्या माहितीनुसार, फर्निचर व्यवसायाशी संबंधित तक्रारदाराकडून वनविभागातील कारवाईची भीती दाखवून तब्बल तीन लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने लाचेची मागणी खरी असल्याचे स्पष्ट झाल्यावर सापळा रचला. ठरल्याप्रमाणे पहिला हप्ता म्हणून ५० हजार रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले होते.

खाजगी इसम रंगेहात अटक -
ठरलेल्या व्यवहारादरम्यान लाचेची रक्कम स्वीकारताना खाजगी इसम प्रदीप मंडल याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. या कारवाईनंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या प्रकरणात वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीनिवास कटकू आणि वनरक्षक नितेश मडावी यांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात असून तपासाची दिशा त्यांच्याकडेही वळली आहे.

कटकू यांचे पूर्वीचे वाद पुन्हा चर्चेत -
या कारवाईनंतर श्रीनिवास कटकू यांच्यावरील पूर्वीचे वादग्रस्त प्रकरण पुन्हा समोर आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ते यापूर्वी असरली वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना बांबू विक्री प्रकरणातील गंभीर अनियमिततेच्या आरोपांमुळे निलंबित करण्यात आले होते.

तत्कालीन उपवनसंरक्षक पूनम पाटील यांनी त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानंतरही आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहारासंदर्भातील तक्रारी सातत्याने समोर येत असल्याची चर्चा वनवर्तुळात आहे.

वनविभागाची प्रतिमा डागाळल्याची भावना -
या प्रकारामुळे वनविभागातील प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रतिमेलाही धक्का बसल्याची भावना व्यक्त केली जात आहे. जंगलसंपत्तीचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी असलेल्या विभागातच अशा प्रकारचे आरोप होणे गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे मत आहे.

अल्लापल्ली वनविभागात अस्वस्थता -
एसीबीच्या कारवाईनंतर अल्लापल्ली वनविभागात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक प्रलंबित प्रकरणे आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढल्याची चर्चा आहे.

सखोल चौकशीची मागणी -
या प्रकरणाची केवळ एका व्यवहारापुरती मर्यादित चौकशी न करता संबंधित अधिकाऱ्यांच्या संपूर्ण कार्यकाळातील आर्थिक व्यवहार, वनउत्पादनाशी संबंधित प्रकरणे आणि सर्व तक्रारींची स्वतंत्र सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.

एसीबीच्या कारवाईमुळे वनविभागातील संभाव्य भ्रष्टाचार साखळी उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos