केरळ एक्स्प्रेसमध्ये टीटीईवर हल्ला : आरोपींसह संरक्षण देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : मध्य रेल्वेच्या १२६२५ केरळ एक्स्प्रेसमध्ये वरिष्ठ तिकीट परीक्षक (टीटीई) अश्विनी कुमार लांजेवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मध्य रेल्वे मुंबईच्या रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती (ZRUCC) चे सदस्य अजय दुबे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणातील आरोपींसह अवैध विक्रेत्यांना संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे.
११ जुलै रोजी बल्लारशाह ते नागपूर दरम्यान धावणाऱ्या १२६२५ केरळ एक्स्प्रेसमध्ये कर्तव्य बजावत असताना वरिष्ठ टीटीई अश्विनी कुमार लांजेवार यांच्यावर मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र पाठवून अशा घटनांना आळा घालण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या अवैध विक्रेत्याविरुद्ध, त्याच्या मालकाविरुद्ध आणि त्याला संरक्षण देणाऱ्या रेल्वे सुरक्षा दल (RPF), शासकीय रेल्वे पोलीस (GRP) तसेच वाणिज्य विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्धही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
अजय दुबे यांनी म्हटले की, अलीकडच्या काळात तिकीट तपासणी अधिकाऱ्यांवर प्रवासी आणि अवैध विक्रेत्यांकडून मारहाण व गैरवर्तनाच्या घटना वाढत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा परिस्थितीत टीटीई कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी पार पाडणे दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे.
ते म्हणाले की, जीवितास धोका असूनही टीटीई कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत रेल्वेच्या महसुलात उल्लेखनीय वाढ करण्यास हातभार लावत आहेत. याशिवाय गर्दीच्या रेल्वेमध्ये प्रवाशांचे नियोजन, नियंत्रण आणि मार्गदर्शन करण्याची महत्त्वाची जबाबदारीही ते पार पाडतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले गेले पाहिजे.
अजय दुबे यांनी रेल्वेमंत्र्यांकडे धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये अवैध विक्रेत्यांच्या प्रवेशावर तातडीने बंदी घालण्याचे निर्देश रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांना देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रत्येक रेल्वेगाडीत रेल्वे सुरक्षा दल किंवा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे किमान दोन सशस्त्र जवान तैनात करण्यात यावेत, जेणेकरून टीटीई कर्मचाऱ्यांना कोणत्याही भीतीशिवाय आपले कर्तव्य पार पाडता येईल.
या प्रकरणातील सर्व आरोपींवर निष्पक्ष चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात रेल्वे कर्मचाऱ्यांवर अशा प्रकारच्या हल्ल्यांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस आणि प्रभावी पावले उचलावीत, अशी मागणीही अजय दुबे यांनी केली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




