गडचिरोलीतील दारुबंदी उठवण्याची मागणी : आत्रामांना वडेट्टीवारांचा पाठिंबा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील दारुबंदी उठवावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. या मागणीसंदर्भात आत्राम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चेसाठी जाणार आहेत. त्यांच्या या मागणीला काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही खुला पाठिंबा दिला आहे.
पुण्यात विषारी दारूमुळे वीसहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर दारुबंदीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी हातभट्टीत तयार होणारी दारू अधिकृत करण्याची मागणी केली होती. या संदर्भात आत्राम यांनी आपले मत मांडले आहे.
आत्राम म्हणाले, गडचिरोलीत गेल्या ४० वर्षांपासून दारुबंदी आहे, परंतु या बंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही. वर्धा जिल्ह्यातही दारूबंदी आहे, तरीही तिथे दारू मोठ्या प्रमाणात विकली जाते. गडचिरोलीत आता उद्योग येऊ लागले आहेत आणि रोजगारनिर्मिती सुरू झाली आहे. त्यामुळे दारुबंदी कायम ठेवून काहीही साध्य होणार नाही.
त्यांनी पुढे म्हटले की, गरीब आदिवासींना महागडी दारू खरेदी करून पिण्याची गरज पडते. म्हणूनच ही बंदी उठवावी आणि मोहाच्या दारूला कायदेशीर मान्यता द्यावी. आदिवासी संस्कृतीत जन्म, विवाह, मृत्यू अशा प्रसंगी मोहाची दारू पिण्याची परंपरा आहे, असेही आत्राम यांनी नमूद केले.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही आत्राम यांच्या मागणीला पाठिंबा दिला. वडेट्टीवार म्हणाले, मी चंद्रपुरातील दारूबंदी पूर्वीच उठवली होती. जगभरात आणि देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये दारू विक्री सुरू आहे. गडचिरोलीतील आदिवासींना मोहफूल दारू पिण्याचा अधिकार आहे. दारुबंदीमुळे व्यसनमुक्ती साध्य होत नाही. त्यामुळे या चर्चेला फारसा अर्थ नाही. विकसित देशांमध्ये या बाबतीत पूर्ण मोकळीक आहे. त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांच्या मागणीला माझे पूर्ण समर्थन आहे.
गडचिरोलीतील दारुबंदी उठवण्याच्या मागणीमुळे राज्यात पुन्हा एकदा दारूबंदी धोरणावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री स्तरावर झालेल्या चर्चेनंतर सरकारची भूमिका काय राहणार, हे पुढील काळात स्पष्ट होईल.
News - Nagpur




Petrol Price




