चंद्रपुरात दुहेरी हत्याकांड, लग्नास नकार दिल्यामुळे प्रियकराने प्रेयसीच्या आईसह नातीचा केला खून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 
लग्नास नकार दिल्यामुळे बिथरलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या आईसह तिच्या सात वर्षांच्या नातीचा गळा दाबून निर्घृण खून केल्याची घटना शहरातील बालाजी वॉर्डात घडली आहे.  या दुहेरी हत्याकांडाने चंद्रपूर शहर हादरले आहे. सुशीला कैलास पिंपळकर (५५) व श्वेता मुकेश किरार (७) अशी मृतांची नावे असून या प्रकरणी प्रियकर प्रल्हाद फेकू गुप्ता याला अटक केली आहे. 
शहरातील बालाजी वॉर्डातील निंबाळकर वाडी येथे सकाळी ७ च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आरोपी प्रल्हाद गुप्ता व लक्ष्मी यांचे गेल्या एक वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. दरम्यान, प्रल्हादने प्रेयसीचे घर गाठून लक्ष्मीवर आपले प्रेम असून तिच्याशी लग्न करणार असल्याचे सांगितले. मात्र, याला लक्ष्मीची आई सुशीला पिंपळकर यांनी नकार दिला. यामुळे प्रल्हाद बिथरला होता व गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता.
सुशीला पिंपळकर यांची मोठी मुलगी आपल्या सात वर्षांच्या मुलीला घेऊन माहेरी चंद्रपुरास आली होती. घटनेच्या दिवशी लक्ष्मी व तिची मोठी बहीण कामानिमित्त बाहेरगावी गेल्या होत्या. ही संधी साधून प्रल्हादने बदला घेण्याचे ठरवले. त्याने रात्री दहाच्या सुमारास लक्ष्मीच्या घरी बळजबरीने प्रवेश केला. घरातील सुशीला पिंपळकर व नात श्वेता किरार या दोघींचा गळा दाबून निर्घृण खून केला व तेथून पळ काढला.
सकाळी सात वाजता बाहेरगावी गेलेली लक्ष्मी व तिची मोठी बहीण घरी आल्यावर त्यांना हा प्रकार समजला. घटनेची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने तपास करून संशयित प्रल्हाद गुप्ता याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान प्रल्हाद गुप्ता याने लग्नाला विरोध केल्यामुळे सुशीला व नातीचा खून केल्याची कबुली दिली.  Print


News - Chandrapur | Posted : 2018-10-25


Related Photos