चांदोरीत बिबट्याचा धुमाकूळ : दोन शेळ्या ठार, उपसरपंचांसह दोघे जखमी

- शौचालयात लपलेल्या बिबट्याचे दोन तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून यशस्वी रेस्क्यू
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या साकोली तालुक्यातील चांदोरी गावात शुक्रवारी पहाटे बिबट्याने धुमाकूळ घालत दोन शेळ्यांचा फडशा पाडला. त्यानंतर गावातील एका घराच्या शौचालयात लपून बसलेल्या बिबट्याने त्याला पाहण्यासाठी गेलेल्या चांदोरीचे उपसरपंच जितेंद्र रहाटे व मंगेश झोडे यांच्यावर अचानक हल्ला केला.
या घटनेत दोघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन तास राबविलेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात यश मिळविले.
नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगत असल्याने चांदोरी परिसरात वन्यप्राण्यांचा वावर सातत्याने वाढत आहे. शुक्रवारी पहाटे बिबट्याने प्रथम गुलाब हातझाडे यांच्या घरातील चार महिन्यांच्या शेळीच्या बछड्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यानंतर त्याने रमेश हातझाडे यांच्या घरात प्रवेश करून आणखी एका शेळीचा फडशा पाडला. सलग दोन ठिकाणी हल्ले केल्यानंतर बिबट्या गावातील मोरेश्वर हातझाडे यांच्या घराच्या परिसरातील शौचालयात जाऊन लपून बसला.
पहाटे गावात बिबट्या शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पहाटे सुमारे पाच वाजल्यापासून सकाळी दहा वाजेपर्यंत बिबट्या शौचालयात दबा धरून बसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी सुरक्षित अंतरावरून बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली.
याचदरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी गेलेल्या उपसरपंच जितेंद्र रहाटे व मंगेश झोडे यांच्यावर बिबट्याने अचानक झडप घालत हल्ला केला. या हल्ल्यात दोघेही किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसर रिकामा करून रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. जवळपास दोन तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला सुरक्षितपणे पकडण्यात वनविभागाला यश आले. बिबट्याच्या यशस्वी रेस्क्यूमुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मात्र, नागझिरा व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वाढता वावर लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे आणि वन्यप्राणी आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
News - Bhandara




Petrol Price




