महत्वाच्या बातम्या

 जागतिक विधवा दिनानिमित्त सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीत एकल महिला दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : जागतिक विधवा दिनाच्या निमित्ताने सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायत कार्यालयात एकल महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महिलांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करणे, त्यांना शासकीय योजनांची माहिती देणे तसेच सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा पूजा विलास रामटेके या होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून सिंदेवाही पोलिस स्टेशनच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी भोंडवे उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निता रणदिवे तसेच मीनाक्षी मेश्राम यांनी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. निता रणदिवे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर ठाकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अंजू भैसारे यांनी केले.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक राणी भोंडवे यांनी एकल महिलांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी महिला सक्षमीकरण, महिला हक्क, कायदे, न्यायव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भातील विविध बाबींवर मार्गदर्शन करत महिलांना त्यांच्या अधिकारांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले.

उपाध्यक्षा पूजा रामटेके तसेच मीनाक्षी मेश्राम यांनी उपस्थित महिलांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी उपलब्ध संधींबाबत माहिती दिली. महिलांनी स्वावलंबी बनून समाजात सक्षमपणे उभे राहावे, यासाठी विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नगरसेविका श्वेता मोहुर्ले, नगरसेविका अस्मिता जुमनाके, प्रशासकीय अधिकारी विजय किरवले, संजय बोंडगुलवार, संगीता कंबलवार, गीता नागापूरे तसेच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मोलाचे सहकार्य केले.

या कार्यक्रमाला सिंदेवाही शहरातील मोठ्या संख्येने एकल महिलांनी उपस्थिती लावली. महिलांच्या हक्कांबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती उपलब्ध करून देणे आणि सक्षमीकरणाचा संदेश पोहोचविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याची भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली. कार्यक्रमामुळे एकल महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाल्याचेही यावेळी सांगण्यात आले.





  Print






News - Chandrapur




Related Photos