समाधान शिबिरात तीन तालुक्यांतील २,५६१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून गडचिरोली, धानोरा आणि चामोर्शी या तीन तालुक्यांतील एकूण २,५६१ पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ, प्रमाणपत्रे, मंजुरीपत्रे तसेच धनादेशांचे वितरण करण्यात आले.
शिबिराला आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलिस अधीक्षक एम. रमेश, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अरुण एम., उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, गडचिरोलीचे तहसीलदार सागर कांबळे, धानोराचे तहसीलदार गणेश माळी, चामोर्शीचे तहसीलदार प्रशांत घोरुडे तसेच नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पोहोचविण्यासाठी महसूल विभागाने अशा शिबिरांचे सातत्याने आयोजन करावे, असे मत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महसूल समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रकरणांचा तातडीने निपटारा करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगितले.
कार्यक्रमात विविध शासकीय योजनांअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मंजुरीपत्रे, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, आर्थिक सहाय्याचे धनादेश तसेच अन्य लाभांचे वितरण करण्यात आले. त्यामुळे अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी नायब तहसीलदार चंदू प्रधान, ज्ञानेश्वर ठाकरे, एस. पी. शेख, अल्पेश बारापात्रे, देवेंद्र वाळके, गिरीश नरोटे यांच्यासह सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहायक जिल्हाधिकारी अरुण एम. यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन नायब तहसीलदार वनिश्याम येरमे आणि अरविंद शेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन तहसीलदार सागर कांबळे यांनी केले.
News - Gadchiroli




Petrol Price




