महत्वाच्या बातम्या

 महात्मा फुले सावित्रीबाई फुले चौकाच्या विकासासाठी आमदार मुनगंटीवार सरसावले


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : मूल शहरातील महात्मा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. चौकाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी मंजूर असूनही काम रखडल्याच्या तक्रारीनंतर माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषद मूलच्या मुख्याधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहराध्यक्ष राकेश देविदास मोहुर्ले यांनी आमदार मुनगंटीवार यांची भेट घेऊन चौकाच्या सौंदर्यीकरणासंदर्भात निवेदन सादर केले. मंजूर निधी उपलब्ध असूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, पुढील १५ दिवसांत काम सुरू न झाल्यास आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

या निवेदनाची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नगर परिषद प्रशासनाला सौंदर्यीकरणाच्या कामात कोणताही विलंब होऊ न देता तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. मंजूर निधीचा नियोजनबद्ध वापर करून कामाला गती देण्यासह चौकाचे सौंदर्यीकरण वेळेत पूर्ण करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या.

महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना साजेसा चौक विकसित व्हावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आमदार मुनगंटीवार यांच्या हस्तक्षेपानंतर नगर परिषद प्रशासनाकडून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos