शाळा परिसरात जिवंत वीजतारांना झुडपांचा विळखा : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी /बल्लारपूर : तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ग्रामीण भागातील वीज वितरण व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी लोंबकळणाऱ्या वीजतारा, उघडे विद्युत डीपी तसेच वीजवाहिन्यांवर वाढलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून संभाव्य अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
भिवकुंड (विसापूर) येथील शासकीय अनुसूचित जाती व नवबौद्ध निवासी शाळेजवळ जिवंत विद्युत तारांना झुडपे व वेलींनी वेढले आहे. परिसरात निवासी शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) तसेच मोठी लोकवस्ती असल्याने विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या धोक्याचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे वीज प्रवाहाचा धोका अधिक वाढत असल्याने ही परिस्थिती गंभीर मानली जात आहे.
याशिवाय, विसापुर येथील दीक्षाभूमी परिसरात ११ के.व्ही. उच्चदाब वीजवाहिनीची गार्डिंग तुटलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली गार्डिंग तुटल्यामुळे वादळी वाऱ्यासह पावसाच्या काळात वीज अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्थानिक नागरिकांनी महावितरण प्रशासनाने या धोकादायक ठिकाणांची तातडीने पाहणी करून झाडांच्या फांद्यांची छाटणी, वेली व झुडपे हटविणे, तुटलेली गार्डिंग दुरुस्त करणे तसेच लोंबकळणाऱ्या वीजतारा सुरक्षित कराव्यात, अशी मागणी केली आहे. संभाव्य दुर्घटना घडण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




