नागपुरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर


- एका बेडवर दोन पेशंट्स

विदर्भ न्यूज एक्स्प्रेस 
वृत्तसंस्था / नागपूर :
आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटवर असल्याचे दिसून येत आहे. शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात एका बेडवर दोन पेशंट्सना ठेवण्यात आले आहे. आकस्मिक रोग विभागातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. इथल्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकल्याची तक्रार असून, हे सर्व रुग्ण कोरोना संशयित आहेत. वॉर्डात बेड्सची कमतरता असल्यामुळे एका बेडवर दोन रुग्णांना ठेवण्यात आले आहे. 
नागपूर येथे कोरोनाचा कहर वाढल्यानंतर नागपुरात आरोग्य व्यवस्थेची तारांबळ उडाल्याचे चित्र आहे आहे. सध्या अशा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने वार्डात कमी खाटा आणि जास्त रुग्ण असे धक्कादायक चित्र निर्माण झाले आहे. काही रुग्ण तर ऑक्सिजनवर असताना दोन रुग्ण एकाच खाटेवर दिसून येत आहेत.
कोरोना टाळायचा असेल तर सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायजर या त्रिसूत्रीचा वापर करणे आवश्यक आहे. मात्र काल नागपुरातील सीताबर्डी बाजारात लोकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. कोविड नियमांचे उल्लंघन होताना दिसले.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरात कोरोनाचा कहर सुरूच असून बुधवारी तब्बल 3 हजार 717 कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे नागपुरातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या दोन लाखांवर पोहचली आहे.गेल्या सात दिवसात नागपुरात 24 हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले असून 232 जणांचा कोरोनाने बळी घेतला.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नागपुरात चिंतेचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. अशात नागपूर शहरातील लक्ष्मीनगर,हनुमान नगर व मंगळवारी झोन हे कोरोना चे हॉटस्पॉट असल्याचं समोर आले आहे.  
झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे हॉस्पिटलमध्ये बेड्स उपलब्ध नसल्याचे काही रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. परंतु नागपूर शहरात पुरेसे बेड्स उपलब्ध असल्याचे महापालिका सांगते. कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या येत्या 4 ते 5 दिवसात कमी होणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांचा आहे. 
  Print


News - Nagpur | Posted : 2021-03-26


Related Photos