धापेवाडा बॅरेजमधून विसर्ग वाढणार : नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

- गोसीखुर्द धरणातूनही १६० क्युमेक्स पाणी वैनगंगेत; २३ व २४ जुलैसाठी यलो अलर्ट जारी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढू लागली असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धापेवाडा बॅरेजमधून सोमवारी दुपारनंतर पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असून नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, धापेवाडा बॅरेजमध्ये सध्या पाण्याची आवक वाढत आहे. सध्या पाच दरवाजे ०.८० मीटरने उघडून ४६१.९० क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, वाढत्या आवकेमुळे हा विसर्ग ७५० ते ८०० क्युमेक्सपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी अल्पावधीत वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी नदीकाठ आणि नदीपात्रापासून दूर राहावे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने नदीपात्रात जाणे, मासेमारी करणे, वाळू उपसा करणे तसेच इतर कोणत्याही प्रकारच्या हालचाली टाळण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
गोसीखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग -
धापेवाडा बॅरेजबरोबरच गोसीखुर्द धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाच्या पायथ्याशी असलेल्या विद्युतगृहातून वैनगंगा नदीपात्रात १६० क्युमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. जलाशयाची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी २० जुलै रोजी सायंकाळी ४.३० वाजल्यापासून हा विसर्ग सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.
इतर धरणांमध्ये विसर्ग नाही -
जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये सध्या तुलनेने कमी ते मध्यम पाणीसाठा आहे. पुजारीटोला धरण ७६.४२ टक्के भरले असले तरी त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. बावनथडी धरणात १८ टक्के, संजय सरोवरमध्ये ३५.३८ टक्के आणि गोसीखुर्द धरणात ४४.०६ टक्के पाणीसाठा असून तेथून अतिरिक्त विसर्ग सुरू नाही. मात्र, धापेवाडा बॅरेजमधील वाढीव विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
यलो अलर्ट; वीज कोसळण्याचा इशारा -
गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात मोठा बदल झाला असून काही भागात मुसळधार, तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता लक्षात घेऊन वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, २३ व २४ जुलैसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने यलो अलर्ट जारी केला आहे. सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचे तसेच नागरिकांना वेळोवेळी आवश्यक सूचना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात ६०.२ टक्के पाऊस; साकोली अव्वल -
१ जून ते २० जुलै या कालावधीत जिल्ह्यात सरासरी २६२.४ मिमी पाऊस नोंदविण्यात आला असून तो सरासरीच्या ६०.२ टक्के आहे. जुलै महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावल्यामुळे बहुतांश तालुक्यांतील पर्जन्यमानात वाढ झाली आहे.
तालुकानिहाय आकडेवारीनुसार साकोली तालुक्यात सर्वाधिक ३९७ मिमी ८३.८ टक्के पाऊस झाला आहे. त्याखालोखाल तुमसरमध्ये २३३ मिमी ८०.७ टक्के पाऊस नोंदविण्यात आला. भंडारा तालुक्यात २३६.६ मिमी ५१.९ टक्के, लाखनीमध्ये २३२.९ मिमी ५२ टक्के आणि लाखांदूरमध्ये २२४.९ मिमी ५३.५ टक्के पाऊस झाला आहे. तर पवनी तालुक्यात सर्वात कमी १९२.३ मिमी ४५.२ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा वाढता जोर, धरणांमध्ये वाढणारी आवक आणि हवामान खात्याने दिलेला इशारा लक्षात घेता पुढील काही दिवस नागरिकांनी नदी, नाले व धरण परिसरात जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




