दूध भेसळखोरांविरुद्ध एफडीएची राज्यव्यापी धडक मोहीम


- युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मालिनयुक्त दूध आढळल्याने कठोर कारवाई; दोषींना जन्मठेप व १० लाखांपर्यंत दंडाची तरतूद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दूध भेसळखोरांविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने एफडीए आतापर्यंतची सर्वात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या तपासणीत दुधात पाणी मिसळण्याबरोबरच युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मालिन आणि इतर घातक रसायनांची भेसळ होत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आले आहेत.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण दूधपुरवठा साखळीवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून जन्मठेपेपर्यंतची शिक्षा आणि १० लाख रुपयांपर्यंत दंडाची कारवाई करण्याचा इशारा एफडीएने दिला आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार, भेसळयुक्त दुधामुळे ग्राहकांच्या आरोग्याला गंभीर इजा झाली किंवा मृत्यूचा धोका निर्माण झाल्यास संबंधित दोषींना १० लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे दूध भेसळ करणाऱ्यांवर यापुढे कठोर कायदेशीर कारवाई होणार आहे.
आठ निकषांवर दुधाची तपासणी -
एफडीएकडून दुधाची गुणवत्ता तपासताना आठ महत्त्वाच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. यामध्ये दुधातील नैसर्गिक स्निग्धांश फॅट, सॉलिड नॉट फॅट एसएनएफ, अतिरिक्त पाण्याचे प्रमाण, युरिया, डिटर्जंट, कॉस्टिक सोडा, फॉर्मालिन, मेलामाइन तसेच लेबलिंग आणि पॅकेजिंगमधील त्रुटींची तपासणी करण्यात येत आहे.
आरोग्यावर गंभीर परिणाम -
ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. वसंत खळतकर यांच्या मते, रासायनिक भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. डिटर्जंट आणि कॉस्टिक सोड्यामुळे पोटात अल्सर, आतड्यांना सूज आणि पचनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात.
युरिया आणि फॉर्मालिनच्या सततच्या सेवनामुळे किडनी आणि यकृत निकामी होण्याचा धोका वाढतो. याशिवाय मेंदूवर परिणाम होण्याची शक्यता असून, लहान मुलांमध्ये कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो.
दूधपुरवठा साखळीवर कठोर नियम -
एफडीएने संपूर्ण दूधपुरवठा साखळीवर कडक नियम लागू केले आहेत. दुधाचे तापमान निश्चित मर्यादेत राखणे बंधनकारक करण्यात आले असून, दूध व्यवसायाशी संबंधित प्रत्येक लहान-मोठ्या व्यावसायिकाला अधिकृत परवाना किंवा नोंदणी आवश्यक राहणार आहे. प्रक्रिया केंद्रांवर अस्वच्छता किंवा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांचा परवाना थेट रद्द करण्यात येणार आहे.
एफडीएचे सहआयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी सांगितले की, दूध भेसळ करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. विभागाची विशेष पथके २४ तास कार्यरत असून, दूध संकलन केंद्रांपासून ते वाहतूक करणाऱ्या टँकर्सपर्यंत प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली जात आहे.
नागरिकांनीही दूध खरेदी करताना जागरूक राहून भेसळीचा संशय आल्यास तातडीने तक्रार करावी. भेसळ सिद्ध झाल्यास संबंधितांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
News - Nagpur




Petrol Price




